पुणे (प्रतिनिधी) : बुद्धिबळाच्या मालिकेमध्ये दोघांचे 6 विरुद्ध 6 असे गुण असताना आणि स्पर्धेत 2 च फेऱ्या बाकी राहिल्यामुळे बुधवारचा डाव हा निर्णायक ठरेल असे सर्व बुद्धिबळ तज्ञांचे मत होते. आजच्या डावामध्ये गुकेशकडे पांढऱ्या सोंगट्या होत्या याचा फायदा तो नक्कीच करून घेईल अशी बुद्धिबळप्रेमींची आशा होती.

पांढऱ्या सोंगट्या खेळताना गुकेशने डावाची सुरुवात e4 या खेळीने केली. मंगळवारच्या विश्रांतीमध्ये दोघांनी डावाची चांगलीच तयारी केली. हे बुधवारी दिसून येत होते. गुकेशच्या खेळीस उत्तर देताना e6 या फ्रेंच डिफेन्स पद्धतीने डिंग लिरेनने डावात बचावाची सुरुवात केली. गुकेशची सातवी a3 ही काहीशी वेगळी खेळी झाली आणि डिंगला विचार करण्यास वेळ घेणे भाग पडले. तेराव्या खेळीस दोघांचे राजाच्या बाजूस किल्ले कोट पूर्ण झाले. गुकेशची मोहरी ही केंद्रस्थानाकडे मजबूत स्थितीत विराजमान होती, तर डिंगच्या उंट आणि घोड्याला अजूनही कार्यक्षम होता आले नव्हते. आता या परिस्थितीत डिंगच्या राजाच्या बाजूस कोणतीही मोहरी नसल्याने गुकेशला डिंगच्या राजाच्या बाजूस हल्ला करण्याची चांगली संधी निर्माण झाली. मात्र डिंग लिरेन याने केलेल्या f5 या खेळीमुळे डिंगला बचावासाठी चांगला मार्ग मिळाला व डावात पुन्हा एकदा समान संधी निर्माण झाल्या.

मात्र 31 व्या खेळीपर्यंत डिंगचा अकार्यक्षम उंट आणि गुकेशचा e4 येथे असलेला कार्यक्षम घोडा यामुळे आता गुकेशचा डाव थोडा उजवा झाला. 41 व्या गुकेशच्या d4 या खेळीमुळे डिंगच्या राजाच्या बाजूवर दबाव निर्माण झाला. परंतु डिंग याने योग्य बचाव करून डाव पुढे चालू ठेवला. 44 व्या खेळीला उंट व घोड्याची अदलाबदल झाल्यानंतर पुन्हा डावात समान स्थिती निर्माण झाली. दोघांकडे वजीर हत्ती आणि प्रत्येकी 5 प्यादी शिल्लक राहिली. मात्र गुकेशने डिंगच्या राजावर मात करण्यासाठी दबाव ठेवला, त्याचा बचाव करत डिंगने वजीराच्या बाजूस बडत प्यादे निर्माण करण्याचा प्रयत्न केला. यातून पुन्हा खेळात काहीशी चुरस निर्माण झाली.

55 व्या खेळीला वजीरावजीरी झाल्यानंतर गुकेशकडे 3 प्यादी तर डिंगकडे 2 प्यादी समोरासमोर राहिली. दोघांचे हत्ती पटावर असल्यामुळे गुकेशला यातून विजय मिळवणे कठीण होते आणि अखेर दोघांनी पुन्हा पुन्हा त्याच त्याच खेळ्या पटावर झाल्यानंतर बरोबरी मान्य केली. आता आज मालिकेतील अंतिम सामना आहे. तो निकाली न झाल्यास 13 तारखेस जलद डावांवर विजेतेपद निश्चित केले जाईल असे बुद्धिबळ खेळाचे विश्लेषण विश्लेषक धनंजय इनामदार यांनी केले आहे.