मुंबई ( प्रतिनिधी ) – धर्माच्या नावावर राजकारण करणाऱ्या लोकांनी गांधी विचार व गांधीजींनी घालून दिलेल्या अहिंसेच्या मार्गाचा अवलंब करावा. सर्वांनी आपापसात न भांडता भाईचारा जपावा. इराण व इस्राईलमध्ये आज जे सुरु आहे त्याची जगभर चर्चा होत आहे. अशावेळी गाधींजींनी घालून दिलेला आदर्श व अहिंसेचा मार्गच महत्वाचा ठरतो, जाती धर्माच्या नावाने राजकारण करणाऱ्यांनी गांधींजींनी घालून दिलेल्या मागार्चा अवलंब करावा, असे प्रभारी रमेश चेन्नीथला यांनी सांगितले.
यावेळी प्रसार माध्यमांशी बोलताना रमेश चेन्नीथला पुढे म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी महात्मा गांधी यांचे नाव सातत्याने घेत असतात पण ते गांधीजींचा आदर्श तसेच गांधीजींनी घालून दिलेला अहिंसेच्या मार्गाचे पालन करताना दिसत नाहीत. जातीच्या धर्माच्या नावावर लोकांमध्ये फुट पाडण्याचे काम ते करत आहेत, हे देशाच्या हिताचे नाही. देशाच्या विकास व प्रगतीसाठी गांधी विचारच महत्वाचा आहे त्याचा अवलंब त्यांनी करावा, असा सल्ला त्यांनी दिला. तसेच केंद्रीय मंत्री अमित शाह यांनी विधानसभा निवडणूक लढवण्याआधीच महाराष्ट्रात पराभव मान्य केला आहे. भाजपाची निती ही वापरा आणि फेकून द्या अशी आहे तेच महाराष्ट्रातही भाजपा मित्रपक्षांसोबत करत आहे असेही चेन्नीथला म्हणाले.
पुढे रमेश चेन्नीथ म्हणाले, भाजपा सरकारचे शेवटचे दिवस उरले असल्याने सरकार धडाधड निर्णय घेत आहे पण सरकारकडे पैसा नाही व निवडणूक होणार असल्याने त्याची अमंलबजावणी होणे कठीण आहे. मते मिळवण्यासाठी भाजपा सरकारची शेवटची धडपड सुरु आहे पण महाराष्ट्राची जनता सुज्ञ आहे त्यांना सर्व समजते असेही चेन्नीथला म्हणाले.