कोल्हापूर (प्रतिनिधी) : राष्ट्रीय हरित लवादाच्या निर्देशानुसार जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी जिल्ह्यात दीपावलीच्या काळात जिल्ह्यात फटाकेबंदीचा आदेश जारी केला आहे. त्यानुसार १३ नोव्हेंबर ते १६ नोव्हेंबर या काळात जिल्ह्यात केवळ हरित फटाके म्हणजे GREEN FIRECRACKERS फोडता येतील. इतर कोणत्याही प्रकारचे फटाके फोडण्यास पूर्णत: बंदी असेल. हरित फटाके हे सायंकाळी सात ते रात्री नऊ या वेळेतच फोडता येतील, असे त्यांनी आदेशात म्हटले आहे.

फटाक्यांमुळे उत्पन्न होणाऱ्या धुरामुळे आणि हानिकारक वायूमुळे कोरोना रुग्णांना जास्तच त्रास होऊ शकतो, हे लक्षात घेऊन दिल्लीतील राष्ट्रीय हरित लवादाने यंदा फटाके फोडण्यावर निर्बंध लादले आहेत. त्यानुसार कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील अनेक शहरांत फटाकेबंदीचा निर्णय घेण्यात आला आहे. आज (बुधवार) जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनीही याबाबत आदेश जारी केला आहे.

आदेशात म्हटले आहे की, मा. राष्ट्रीय हरित लवाद, नवी दिल्ली यांनी दिलेल्या आदेशाची अंमलबजावणी कोल्हापूर जिल्ह्यामध्ये करणे बंधनकारक आहे. त्यानुसार शासनाकडून प्राप्त होणाऱ्या आदेशास अधीन राहून  दिवाळी सणाच्या कालावधीत म्हणजे १३ ते १६ नोव्हेंबर या काळात कोल्हापूर महानगरपालिका व जिल्ह्यातील सर्व नगरपालिका, नगरपरिषद, नगरपंचायत क्षेत्रामध्ये कोविड-१९ संसर्गाच्या पार्श्वभूमीवर हवा प्रदूषणावर नियंत्रण ठेवण्यासाठी खालीलप्रमाणे आदेश देत आहे.

कोल्हापूर महानगरपालिका व जिल्ह्यातील सर्व नगरपालिका, नगरपरिषद, नगरपंचायत क्षेत्रामध्ये फक्त ‘Green firecrckers’ ची विक्री करण्यास व सायंकाळी ०७ ते रात्री ०९ पर्यंत परवानगी असेल. वरील आदेशाचे काटेकोरपणे पालन केले जात असलेबाबत तपासणी करणेचे अधिकार हे पोलीस व महानगरपालिका व नगरपालिका / नगरपरिषद / नगरपंचायतमधील अधिकारी / कर्मचारी यांना देणेत येत आहेत. उपरोक्त आदेशाचे पालन न करणाऱ्या कोणतीही व्यक्ती अथवा संस्थेवर फौजदारी कारवाई करण्यात येईल याची नोंद घ्यावी.