मुंबई (प्रतिनिधी ) : आता लवकरच मराठी प्रेक्षकांना मनोरंजनाची मेजवानी पाहायला मिळणार आहे. हिंदी टेलिव्हिजन इंडस्ट्रीत ‘लाफ्टर शेफ’ हा कार्यक्रम चांगलाच गाजत आहे. या कार्यक्रमात टेलिव्हिजन इंडस्ट्रीतील विविध सेलिब्रिटी स्वयंपाक करत विनोदाचीही फोडणी देताना दिसत आहेत. आता लवकरच या ‘लाफ्टर शेफ’ची थीम मराठीमध्ये दिसणार आहे. स्टार प्रवाहवर ‘शिट्टी वाजली रे’ हा कार्यक्रम सुरू होणार आहे.

‘शिट्टी वाजली रे’ या कार्यक्रमाचा प्रोमो रिलीज झाला आहे. या प्रोमोमध्ये अमेय वाघ या शोचं सुत्रसंचालन करताना दिसत आहे. या भन्नाट कार्यक्रमात निक्की तांबोळी, विजय पाटकर, आशिष पाटील, प्रियदर्शन जाधव, माधुरी पवार, संकेत पाठक असे अनेक कलाकार सहभागी होणार आहेत.

या कार्यक्रमाविषयी सांगताना अमेय वाघ म्हणाला की, ‘शिट्टी वाजली रे’ कार्यक्रमाच्या निमित्तानं जवळपास 10 वर्षांनंतर मी टीव्ही विश्वात पुनरागमन करतोय. स्टार प्रवाहसोबत जवळपास 17 वर्षांनंतर पुन्हा एकदा काम करण्याचा योग जुळून आला आहे. स्टार प्रवाहच्या सुरुवातीच्या काळात मी ‘गोष्ट एका जप्तीची’ नावाच्या मालिकेत काम केलं होतं. मला स्वयंपाकाची अतिशय आवड आहे. त्यामुळे ‘शिट्टी वाजली रे’ कार्यक्रमासाठी विचारणा झाली तेव्हा तातडीनं होकार दिला. मला आणि माझ्या बायकोला अजिबात स्वयंपाक येत नव्हता, मात्र लॉकडाऊनमुळे आम्ही दोघंही स्वयंपाक करायला शिकलो. तेव्हापासून मला स्वयंपाकाची आवड निर्माण झाली.