मुंबई ( प्रतिनिधी ) : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील महायुती सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार रविवारी झाला. यात उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील नऊ आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. तर कालपासून नागपूरमध्ये हिवाळी अधिवेशनाला सुरुवात झाली आहे.

काँग्रेसच्या बड्या नेत्याकडून छगन भुजबळांना पक्षांतराची पहिली ऑफर देण्यात आली आहे. छगन भुजबळ आमच्यासोबत काम करायला तयार असतील, तर आम्ही त्यांचे स्वागत करू, असे काँग्रेस नेते नितीन राऊत यांनी म्हटले आहे. तुम्ही एकदा पुन्हा विचार करा की कोणासोबत राहायचं आणि कसं राहायचं. तसेच काँग्रेसचा गट नेता निवडण्यात आधीच उशीर झाला आहे, आणखी उशीर केलं जाऊ नये, राष्ट्रात काँग्रेस पक्षाला उभे करण्याची गरज आहे. असेही नितीन राऊत म्हणाले.

राष्ट्रवादी अजित पवार गटाचे माजी मंत्री छगन भुजबळ यांना मंत्रिमंडळात संधी मिळणार अशी चर्चा असतानाच त्यांना मंत्रिमंडळातून डावलण्यात आले. यामुळे छगन भुजबळ नाराज झाले आहेत. त्यामुळे छगन भुजबळ राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला सोडचिठ्ठी देणार का? अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.