कळे (प्रतिनिधी) : कळे व खेरीवडे ( ता.पन्हाळा ) गावास पाणीपुरवठा करणाऱ्या नदी मधील जॅकवेलचा  बंद पडलेला स्टार्टर पुराच्या पाण्यातून बोटीने  जाऊन धाडसाने दुरुस्त करून तो सुरक्षित  ठिकाणी ठेवण्याचे काम जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कोल्हापूर पथक व ग्रामंचायत कर्मचारी यांनी केले. 

गगनबावडा तालुक्यासह पन्हाळा तालुक्यातील पश्चिम विभागात पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे कुंभी नदीपात्रात असणारे कळे-खेरीवडे ग्रामपंचायतचे गावास पाणीपुरवठा करणारे जॅकवेल पूर्णपणे पुराच्या पाण्यात बुडाले. त्यामुळे जॅकवेलचा स्टार्टर बंद पडला होता. हा स्टार्टर दुरुस्त करणे व सुरक्षित ठिकाणी ठेवण्यासाठी ग्रामपंचायतीने जिल्हा आपत्ती व्यवस्थापन, कोल्हापूर पथकास पाचारण केले.   

जिल्हा आपत्ती निवारण पथक प्रमुख (के.डी.आर.एफ ) शैलेश हांडे व त्यांचे सहकारी तसेच ग्रामंचायतचे कर्मचारी सचिन पाटील, सचिन लायकर, हर्षद पडवळ, राजेंद्र चौगले (मिस्त्री) यांनी घटनास्थळी जाऊन स्टार्टर दुरुस्त केला व तो सुरक्षित ठिकाणी ठेवला. या मोहिमेत  कळेचे मंडल अधिकारी सुरेश ठाकरे व तलाठी संदीप कांबळे सहभागी झाले होते.