सातारा : शरद पवार यांच्या पक्षाने लोकसभा निवडणुकीत घवघवीत यश संपादन केले. लोकसभा निवडणुकीनंतर शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात सध्या उत्साहाचे वातावरण आहे. लोकसभा निवडणुकीत अजित पवारांच्या राष्ट्रवादीला हवं तसं यश मिळवता आलं नाही. त्यामुळे राष्ट्रवादीतील आमदार पुन्हा शरद पवारांकडे येणार असल्याच्या राजकीय चर्चा रंगू लागल्या आहेत. या चर्चेला अजित पवार गटाकडून पूर्णविराम देण्यात आला आहे. परंतु आमदार रोहित पवार आणि जयंत पाटील यांच्याकडून तसा दावा आजही केला जातो. आता, शरद पवार यांनी याबाबत गौप्यस्फोट केला आहे. पक्ष सोडून गेलेले लोक मला भेटत नाहीत, पण ते जयंतरावांना भेटतात असा गौप्यस्फोटच शरद पवारांनी केला आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा आणि संस्थापक शरद पवार हे आज सातारा दौऱ्यावर होते, यावेळी त्यांनी साताऱ्यातील रयत शिक्षण संस्थेला भेट दिली. त्यानंतर, पत्रकार परिषदेत त्यांनी विविध मुद्द्यावर भाष्य केले. सरकारने जाहीर केलेल्या लाकडी बहीण योजनेचं स्वागत करताना, या योजनेच्या अंमलबजावणीवर त्यांनी प्रश्न उपस्थित केला आहे. तर, तुमच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये येण्यासाठी अजित पवारांच्या पक्षाताली काही नेते उत्सुक असल्याच्या प्रश्नावरही त्यांनी सडेतोड उत्तर दिलं आहे. ”माझ्या संपर्कात कोणीही नाही, मी त्याच्यात लक्षही देत नाही. पण, जयंत पाटील यांना ते लोकं भेटतात याची माहिती मला आहे. त्याच्यावर आऊटकम काय येईल हे उद्याचं मतदान झाल्यावर कळेल,” असंही पवार यांनी म्हटलंय.