मुंबई (प्रतिनिधी ) : सध्या आयपीएलची सर्वत्र चांगली चर्चा रंगली आहे. आयपीएल 2025 साठी 46 खेळाडूंना रिटेन करण्यात आले आहेत. तर मेगा लिलावात एकूण 182 खेळाडूंचा लिलाव झाला आहे. आता 10 संघांचे कर्णधार कोण असतील याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

हार्दिक पांड्या आयपीएल 2025 मध्ये संघाचे नेतृत्व करणार असल्याचे मुंबई इंडियन्सने जाहीर केले आहे. ऋतुराज गायकवाड आयपीएल 2024 मध्ये चेन्नई सुपर किंग्जचा कर्णधार होता आणि त्याच्या नेतृत्वात संघानेही चांगली कामगिरी केली.

आयपीएल 2025 च्या मेगा लिलावापूर्वी, विराट कोहली पुन्हा एकदा आरसीबीचा कर्णधार बनेल, अशी चर्चा सुरु होती. गेल्या आयपीएलमध्ये गुजरात टायटन्सचा कर्णधार म्हणून शुभमन गिल फारसा यशस्वी ठरला नाही. असे असूनही, तो आयपीएल 2025 मध्ये जीटीचे कर्णधारपद सांभाळताना दिसू शकतो.

पंजाब किंग्जने श्रेयस अय्यरसाठी 26.75 कोटींची बोली लावली होती. त्याच्या नेतृत्वाखाली केकेआरचा संघ आयपीएल 2024 चा चॅम्पियन बनला. श्रेयस अय्यरवर मोठी बोली लावण्यात आलीये त्यामुळे तो या वेळी पंजाबचे नेतृत्व करणार असल्याचे बोलले जात आहे.

लखनौ सुपर जायंट्सचे कर्णधारपद सोडल्यानंतर केएल राहुल आयपीएल 2025 मध्ये दिल्ली कॅपिटल्सकडून खेळणार आहे. ऋषभ पंतच्या जाण्याने कर्णधारपदाची जागा रिक्त झाली आहे, जी राहुल भरून काढेल अशी शक्यता आहे.

लिलावापूर्वी निकोलस पूरनला कर्णधार बनवण्याची शक्यता वर्तवली जात होती, मात्र ऋषभ पंतवर 27कोटींची बोली लागल्यानंतर यावेळी लखनऊची कमान पंतच्या हाती राहणार असल्याचे जवळपास निश्चित मानले जात आहे. यापूर्वी तो दिल्ली कॅपिटल्सचा कर्णधार होता.

केकेआरचे कर्णधारपद कोणाकडे जाणार याबाबत अजूनही संभ्रम आहे. एकीकडे रिंकू सिंगला कर्णधार बनवण्याच्या अफवा आहेत, तर दुसरीकडे 23.75 कोटींना विकला गेलेला व्यंकटेश अय्यरही कर्णधारपदाच्या शर्यतीत आहे.

संजू सॅमसन 2021 पासून राजस्थान रॉयल्सचा कर्णधार आहे आणि आयपीएल 2025 मध्येही तो संघाचे नेतृत्व करताना दिसणार आहे. पॅट कमिन्सच्या नेतृत्वाखाली एसआरएचने आयपीएल 2024 मध्ये अंतिम फेरी गाठली होती. 18 कोटींमध्ये कायम ठेवलेल्या कमिन्सकडे यावेळीही संघाचे कर्णधारपद जाईल, अशी चर्चा आहे.