कोल्हापूर (प्रतिनिधी) : महानगरपालिकेच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांनी आज (रविवार) पंचगंगा नदी घाट, रंकाळा तलाव परिसरासह अन्य ५ ठिकाणी श्रमदान आणि लोकसहभागातून स्वच्छता मोहिमेतून परिसर स्वच्छ केला.

आजच्या स्वच्छता मोहिमेव्दारे शहरातील रिलायन्स मॉल मागील परिसर, खानविलकर पेट्रोल पंप ते भगवा चौक, पंचगंगा नदी घाट परिसर, इंदिरा सागर हॉल ते आयसोलेशन हॉस्पिटल, रंकाळा तलाव परिसर व शाहू स्मृती बाग परिसर, हुतात्मा पार्क परिसर आणि जयंती पंपीग स्टेशन या ७ ठिकाणी अधिकारी, कर्मचाऱ्यांनी हातात झाडू घेऊन कचरा व प्लास्टिक गेाळा करुन परिसर चकाचक केला. महापालिका आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांच्या संकल्पनेतून महापौर निलोफर आजरेकर, उपमहापौर संजय मोहिते, स्थायी समिती सभापती सचिन पाटील, गटनेते शारंगधर देशमुख यांची प्रेरणा व प्रोत्साहनामुळे शहरामध्ये गेली ७३ आठवडे स्वच्छता अभियान राबवून लोकांनाही आरोग्य शिक्षणाचा संदेश दिला जात आहे. स्वच्छतेबाबत शहरवासियांमध्ये जागृती आणि प्रबोधनावरही महापालिका प्रशासनाने भर दिला आहे

स्वच्छता अभियानातून शहरातील कित्तेक नाले, रस्ते, फुटपाथ, उद्याने तसेच  प्रमुख चौकातील कचरा व प्लास्टिक गेाळा केल्याने रोगराईला अटकाव करण्यास मदत होत आहे. आतापर्यंत कित्तेक टन कचरा व प्लास्टिक गोळा केल्याने स्वच्छता आणि पर्यावरण जोपासण्यास मदत होते आहे. गेली ७३ आठवडे अखंडपणे स्वच्छता अभियान राबविल्यामुळे शहरातील नाल्यांना नदीचे स्वरुप प्राप्त झाले आहे. कित्तेक गटारीं खळखळ वाहू लागल्या आहेत, तर कित्तेक रस्त्यांनी, चौकांनी मोकळा श्वास घेतला आहे. ही किमया केवळ सातत्यपूर्ण आणि अखंडपणे राबविलेल्या स्वच्छता अभियानाची आहे. यापुढेही स्वछता अभियान दर रविवारी सातत्यपूर्ण हाती घेतले जाणार असून अधिकारी, कर्मचाऱ्यांबरोबरच शहरवासियांनीही या अभियानात सहभागी व्हावे, असे आवाहन महापौर सौ. निलोफर आजरेकर आणि आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांनी केले आहे.