कोल्हापूर ( प्रतिनिधी ) : व्यायाम करणे ही चांगली सवय आहे. पण हिवाळ्यात व्यायाम करणे फायदेशीर असते. हिवाळ्यात घाम कमी येतो, हवा सुसह्य असते. त्यामुळे व्यायाम केल्यावर अधिक फ्रेश वाटते. हिवाळ्यात व्यायाम करण्याचे अनेक फायदे आहेत. थंडीमुळे घरच्या बाहेर पडून व्यायाम करण्याची इच्छा कमी होते, पण नियमित व्यायाम केल्याने शरीरास अनेक फायदे होतात.

हिवाळ्यात व्यायाम केल्याने शरीरातील रक्तप्रवाह वाढतो आणि रोगप्रतिकारक शक्ती मजबूत होते. त्यामुळे सर्दी, खोकला आणि इतर ऋतुमानी आजारांपासून संरक्षण मिळते. हिवाळ्यात शरीरात काही ब्राऊन फॅट ऍक्टिव्ह होतात, जे कॅलरी बर्न करण्यास मदत करतात. त्यामुळे नियमित व्यायाम केल्याने वजन कमी करण्यास मदत होते. नियमित व्यायाम केल्याने हृदयाची ताकद वाढते आणि हृदयाशी संबंधित आजारांचा धोका कमी होतो. व्यायाम केल्याने शरीरात एंडॉर्फिन हार्मोन स्रवते, जे मन शांत आणि प्रसन्न ठेवण्यास मदत करते. नियमित व्यायाम केल्याने शरीरात ऊर्जा पातळी वाढते आणि आपण दिवसभर अधिक सक्रिय राहू शकतो. थंडीत पचनाच्या समस्या उद्भवतात पण व्यायाम केल्याने पचन क्रिया सुधारते.

सुरुवातीला चालणे, पोहणे, जॉगिंग, योगासन, सूर्यनमस्कार असे सोपे व्यायामप्रकार करावेत. कारण कोणाचे अनुकरण करून दोन – दोन तास व्यायाम करणे, जिममध्ये जाणे, वजने उचलणे असे करतात परंतु ते प्रत्येकाच्या शरीराला झेपणारे नसते. थंडीत सूर्यनमस्कार, पर्वतासन, वीरभद्रासन, मत्स्यासन, हलासन, सर्वांगासन करतात.