मुंबई (प्रतिनिधी) : विधानसभा निवडणूकांचा निकाल लागला असून महायुती सरकारने जास्त जागा जिंकल्या आहेत. त्याचबरोबर सत्ता स्थापनेसाठी बैठका आणि चर्चा सुरू आहेत. याच पार्श्वभूमीवर शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी सवाल उपस्थित केला असल्याची माहिती समोर येत आहे. महाविकास आघाडी सरकार सत्तेत आलं असतं आणि दोन दिवसात सरकार स्थापन झालं नसतं तर राष्ट्रपती राजवट लागण्याची शक्यता वर्तवण्यात आली होती. मग आता 5 डिसेंबर रोजी शपथविधी होणार आहे, तोपर्यंत राज्य कुणाच्या भरवशावर ठेवण्यात आलं आहे असा सवाल सुषमा अंधारे यांनी उपस्थित केला आहे.

सुषमा अंधारे पुढे काय म्हणाल्या..?

सुषमा अंधारे पुढे म्हणाल्या की, विजयाची शक्यता नसलेल्या शिंदे गटाच्या एका वाचाळवीर नेत्याने म्हटलं होतं की, जर 48 तासांममध्ये महाविकास आघाडीने सरकार स्थापन करू शकले नाही तर राज्यात राष्ट्रपती राजवट लागू शकते. त्याचवेळी आता सर्वात मोठा पक्ष म्हणून भारतीय जनता पक्षाचा मुख्यमंत्री अजून ठरत नाही.

आज असं कळतंय की मुख्यमत्रिपदाचा शपथविधी हा 5 डिसेंबर रोजी होणार आहे. मग भारतीय जनता पार्टी ज्या लाडक्या बहिणीचा गवगवा करतेय त्या लाडक्या बहिणींनी सत्तेमध्ये वाटा मिळणार का? लाडकी बहीण 1500 रुपयामध्ये आणि आख्खी तिजोरी ही लाडक्या भावाच्या हाती हे किती दिवस चालणार. या भाजपमध्ये एकही लाडकी बहीण मुख्यमंत्रिपदाच्या योग्यतेची नाही का असा सवालही सुषमा अंधारेंनी उपस्थित केला आहे.