पुणे ( वृत्तसंस्था ) : पुण्यातील पोर्श कार अपघातानंतर आता राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख देवेंद्र फडणीस यांना लक्ष्य केलं आहे. देवेंद्रजी, आता तुम्हीच सांगा आम्ही गृहमंत्र्यांचा राजीनामा का नाही मागायचा? असा सवाल अनिल देशमुख्य यांनी फडणवीसांना केला आहे. काही महिन्यांपूर्वी एखादा श्वान गाडीखाली आला तरी विरोधक गृहमंत्र्यांचा राजीनामा मागतील, असं विधान राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं होतं. यावर आता अनिल देशमुखांनी टीका केली आहे. एक्स या समाज माध्यमावर पोस्ट करत देवेंद्र फडणवीस यांना त्यांनी लक्ष्य केलं आहे.

यावर त्यांनी म्हटलंय की, “देवेंद्र फडणवीस, काही दिवसांपूर्वीच तुम्ही म्हणाला होतात की गाडीखाली कुत्रा आला तरी विरोधक राजीनामा मागतील. आज गरिबा घरची दोन लेकरं धनदांडग्याच्या गाडी खाली चिरडली आणि तुमच्या व्यवस्थेने हे दोन जीव घेणाऱ्या हैवानाला पिझ्झा बर्गर खाऊ घातले, दहा तासात जामीन करून दिला, तो पण रविवारी”. तसेच देवेंद्रजी आता तुम्हीच सांगा आम्ही गृहमंत्र्यांचा राजीनामा का नाही मागायचा? असा प्रश्नही त्यांनी विचारला.

फेब्रुवारी महिन्यात ठाकरे गटाचे माजी नगरसवेक अभिषेक घोसाळकर यांची हत्या करण्यात आली होती. मॉरिस नावाच्या व्यक्तीने त्यांच्यावर गोळ्या झाडून स्वतःही आत्महत्या केली होती. तसेच त्याच्या काही दिवसांपूर्वी उल्हासनगरमधील एका पोलीस ठाण्यात  भाजपच्या  आमदारानेही एकावर गोळीबार केला होता. त्यानंतर राज्यात कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न उभा राहत असून त्याला गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांची निष्क्रियता जबाबदार आहे, असा आरोप विरोधकांकडून करण्यात आला होता. तसेच विरोधकांनी देवेंद्र फडणवीस यांच्या राजीनाम्याचीही मागणी केली होती. “विरोधकांनी राजीनाम्याची केलेली मागणी राजकीय आहे.विरोधी पक्षाची स्थिती अशी आहे की, गाडीखाली एखादा श्वान आला तरी ते गृहमंत्र्यांचा राजीनामा मागतील”, असे फडणवीस त्यावेळी म्हणाले होते.