दिल्ली (वृत्तसंस्था) : देशात निवडणुकीची प्रक्रिया सुरू आहे. या निवडणुकीत जेव्हा तुम्ही मतदान केंद्रावर जाल तेव्हा एक गोष्ट लक्षात ठेवा. तुमचे मत भाजपा आणि त्यांच्या सहकारी पक्षांविरोधात द्या, असं आवाहन खासदार शरद पवार यांनी केलं. दिल्लीच्या रामलीला मैदानातून शरद पवारांनी सत्ताधाऱ्यांवर जोरदार निशाणा साधला आहे.
यावेळी शरद पवार म्हणाले, दिल्ली, झारखंडचे मुख्यमंत्री यांच्यावर ज्यारितीने कारवाई झाली, ती पाहता भाजपा सरकारने लोकशाही आणि देशाच्या संविधानावर एक मोठा प्रहार केला आहे. या देशाच्या लोकशाहीसाठी आणि संविधान वाचवण्यासाठी ज्या राजकीय शक्ती आहेत भारतीय जनता पार्टी आणि त्यांचे सहकारी यांच्याबाबत विचार करण्याची वेळ आता आली आहे. देशाला चुकीच्या मार्गाने घेऊन जाणाऱ्यांना देशातील जनता योग्य मार्गावर कसं आणते याचे चांगले उदाहरण तुम्ही देऊ शकता, असंही शरद पवार यांनी सांगितले.
तर आज केजरीवालांना जेलमध्ये पाठवले, याआधी झारखंडचे मुख्यमंत्र्यांनाही जेलमध्ये पाठवले. दिल्ली असो, महाराष्ट्र किंवा पश्चिम बंगालचे राजकीय नेते, आमदार, लोकसभा सदस्य, विरोधी पक्षातील नेत्यांना जेलमध्ये पाठवण्याचं काम हे सरकार करत आहे. ही कारवाई संविधान आणि लोकशाहीवरील हल्ला आहे. बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला संविधान दिले. त्यावर जर हल्ला होत असेल, लोकशाही धोक्यात असेल तर प्रत्येक भारतीयाची जबाबदारी त्याला वाचवण्याची आहे. आणि आम्ही हे पाऊल उचलल्याचही पवारांनी यावेळी सांगितले.