देवगड (प्रतिनिधी)- देवगड तालुक्यातील कोटकामते गावच्या माजी सरपंच सायली प्रदीप पारकर यांच्या घरातील पावणेचार तोळे वजनाचा सुमारे अडीच लाख रुपये किमतीचा राणीहार घरातून चोरीस गेल्याची तक्रार देवगड पोलीस स्थानकात पारकर यांनी दिली आहे. 15 फेब्रुवारी ते 18 फेब्रुवारी या कालावधीत ही घटना घडली असल्याचे पारकर यांनी तक्रारीत म्हटले आहे. याबाबत देवगड पोलिसांनी अज्ञात चोरट्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार कोटकामते येथील माजी सरपंच सौ सायली प्रदीप पारकर यांच्या घरी त्यांच्या मुलाचे 19 फेब्रुवारी 2024 रोजी लग्न कार्य होते. यात या लग्नविधी कार्यक्रमाच्या पूर्वी दिनांक 18 फेब्रुवारी रोजी पारकर यांच्या बेडरूम मधील कपाटातील असलेल्या दागिन्यांमध्ये चार तोळे वजनाचा 2 लाख 52 हजार ३७० रुपये एवढ्या किमतीचा राणी हार नसल्याचे पारकर यांच्या निदर्शनास आले.

याबाबत त्यांनी घरात सर्वत्र शोधाशोध सुरू केली. मात्र कुठेही मिळाला नसल्याने अखेर त्यांनी आपल्या बेडरूमच्या कपाटामधील राणीहार चोरीस गेल्याची तक्रार 25 जुलै रोजी देवगड पोलिसांत दिली . देवगड पोलिसांनी अज्ञात चोरट्या विरोधात गुन्हा दाखल केला असून याबाबतचा अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक सुधीर कदम करत आहेत.