मुंबई (प्रतिनिधी) : मराठीतील प्रसिद्ध दिग्दर्शक आणि अभिनेते प्रवीण तरडे यांनी ‘धर्मवीर’, ‘मुळशी पॅटर्न’, ‘सरसेनापती हंबीरराव’ सारख्या चित्रपटातून दिग्दर्शनाबरोबरच अभिनयाचीही छाप पाडली. आता दाक्षिणात्य चित्रपटसृष्टी गाजवण्यासाठी ते सज्ज झाले आहेत. या सिनेमातील त्यांचा पहिला लूक समोर आला आहे.

काही दिवसांपूर्वीच प्रविण तरडेंनी दाक्षिणात्य सिनेसृष्टीत एन्ट्री घेत असल्याचे सांगितले होते. परंतु, या सिनेमाचं नाव त्यांनी गुलदस्त्यात ठेवलं होतं. आता अखेर या सिनेमाबाबत त्यांनी मोठी बातमी दिली आहे. ‘अहो विक्रमार्का’ असं या दाक्षिणात्य सिनेमाचं नाव आहे. यामध्ये प्रविण तरडे या सिनेमात खलनायकाच्या भूमिकेत दिसणार आहेत.

या सिनेमातील त्यांच्या लूकचं पोस्टर समोर आलं आहे. या पोस्टरमध्ये त्यांचा दमदार लूक पाहायला मिळत आहे. दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीत मुख्य खलनायक म्हणून माझा प्रवेश…अहो विक्रमार्कामधे, असुरा बनून येतोय तुमच्या भेटीला…मराठी बरोबर भारतातल्या सहा भाषांमधे संपूर्ण भारताचे मार्केट आता आपलं आहे, असं त्यांनी पोस्टमध्ये लिहिलं आहे. त्यांना साऊथ सिनेमामध्ये पाहण्यासाठी चाहतेदेखील उत्सुक आहेत.

त्यांच्या पोस्टवर कमेंट करत चाहत्यांनी प्रविण तरडेंना शुभेच्छा दिल्या आहेत. या चित्रपटाचे एस. एस. राजामौली फिल्म्सचे सहाय्यक दिग्दर्शख त्रिकोटी पेटा यांनी सिनेमाचं दिग्दर्शन केलं आहे. तर डॉ. मिहीर कुलकर्णी यांनी निर्मिती केली आहे. तेलुगु, हिंदी, तमिळ, कन्नड, मल्याळम, बंगाली, मराठी अशा एकूण ७ भाषांमध्ये हा सिनेमा प्रदर्शित केला जाणार आहे.