सातारा: देशात सात टप्प्यात लोकसभेच्या निवडणुका होत आहेत. त्यातील सहाव्या टप्प्यातील मतदान काल 25 मे रोजी पार पडले. अजून सातव्या टप्प्यातील मतदान बाकी आहे. त्यानंतर 4 जून रोजी लोकसभेचा निकाल लागणार आहे. पण त्यापूर्वीच कोल्हापूर, सांगली, पुणे, बारामती या ठिकाणी उमेदवारांचे विजयाचे बॅनर झळकले होते. आता खंडाळा तालुक्यात शशिकांत शिंदे यांच्या विजयाचे बॅनर झालकल्याने आश्चर्य व्यक्त केलं जात आहे.

सातारा लोकसभा निवडणुकीसाठी अतिशय चुरशीची लढत झाली. महायुतीचे उदयनराजे भोसले विरुद्ध महाविकास आघाडीचे शशिकांत शिंदे यांच्यात काट्याची टक्कर झाली आहे. मतदानानंतर लोकांमध्ये सातारा लोकसभेमधून कोण जिंकणार याबाबत अनेक तर्कवितर्क लढवले जात आहेत. अशा वेळी खंडाळा तालुक्यात शशिकांत शिंदे यांच्या विजयाचे बॅनर निकालापूर्वीच झळकल्याने सर्वत्र आश्चर्य व्यक्त केले जात आहे. महामार्ग लगतच लावलेल्या या बॅनर्सनी सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे.

सातारा लोकसभेसाठी उमेदवार निश्चित करण्यापासूनच मोठी चुरस निर्माण झाली होती. मुळातच महायुतीचे उमेदवार जाहीर होण्यापूर्वी महाविकास आघाडीने आमदार शशिकांत शिंदे यांना लोकसभेची उमेदवारी दिली. त्यानंतर वेळाने छत्रपती उदयनराजे भोसले यांना महायुतीकडून उमेदवारी देण्यात आली. तो पर्यंत शशिकांत शिंदे यांनी प्रचारात आघाडी घेतली होती. तसेच जिल्ह्यातील हे दोन्ही उमेदवार तगडे असल्याने मोठी चुरस निर्माण झाली होती.

अतिशय चुरशीने झालेल्या या निवडणुकीत कोण बाजी मारणार याबाबत शक्यता वर्तवल्या जाऊ लागल्या आहेत. मात्र या परिस्थितीत खंडाळा तालुक्यात महामार्गा लगत शशिकांत शिंदे यांचा खासदारपदी विजयी झाल्याचे अभिनंदन पर बॅनर लावण्यात आले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस कार्यकर्त्यांना विजयाची खात्री असल्याने त्यांनी निकालापूर्वीच हे बॅनर लावलेले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस औद्योगिक सेलचे जिल्हाध्यक्ष बंडू ढमाळ व त्यांच्या सहकार्यांनी हे बॅनर झळकवले आहेत.

त्यामुळे महामार्गावरून प्रवास करणाऱ्या सर्वच सातारावाशीयांचे लक्ष वेधले जात आहे. लोकसभा निकालाला अजून दहा दिवसांचा अवधी असतानाचा लोकांची उत्सुकता शिगेला पोहचली आहे. त्यातच खंडाळ्यात विजयाचे बॅनर झळकल्याने चर्चेला उधाण आले आहे. सध्या तालुक्यात हाच विषय लक्षवेधक ठरत आहे.