चेन्नई : गुरूवारी झालेल्या जागतिक बुद्धिबळ अजिंक्यपदाच्या लढतीत भारताचा डी. गुकेश विश्वविजेता ठरला. भारताचा १८ वर्षाचा बुद्धिबळपटू डी गुकेशने इतिहास रचला आहे. चीनचा खेळाडू आणि गेल्या वर्षीचा विजेता डिंग लिरेनला पराभूत करून गुकेश हा सर्वात तरूण बुद्धिबळ विश्वविजेता ठरला आहे. गुकेशने यावर्षी सहभाग घेतलेल्या प्रत्येक स्पर्धेत बाजी मारत विजेतेपदाला गवसणी घातली आहे. मग ते कँडिडेट्स असो, बुद्धिबळ ऑलिम्पियाड असो किंवा जागतिक स्पर्धा असो. बुद्धिबळाच्या इतिहासात आपले नाव सोनेरी अक्षरांनी उमटवणारा भारताचा लाडका बुद्धिबळपटूचे राहणीमान आहे तरी कसे, चला तर जाणून घेऊयात
गुकेशचे राहणीमान ‘असे’ होते…
डी गुकेशचं पूर्ण नाव गुकेश दोम्मराजू असून गुकेशचा जन्म २९ मे २००६ मध्ये चेन्नईत झाला. त्याच्या वडिलांचे नाव रजनीकांत आहे आणि ते कान, नाक आणि घश्याचे सर्जन आहेत. तर त्याची आई पद्मा या सूक्ष्मजीवशास्त्रज्ञ आहेत. गुकेशने वयाच्या सातव्या वर्षापासून बुद्धिबळ खेळण्यास सुरूवात केली. बुद्धिबळसाठी शाळा सोडणाऱ्या गुकेशसाठी विश्वेविजेतेपद जिंकणारा क्षण हा खूप महत्त्वाचा असून त्याने घेतलेल्या अथ्थक परिश्रम सार्थकी लावणारा क्षण होता. आपल्या मुलाने घेतलेल्या या घवघवशीत यशाबद्दल आनंदाने त्याचा उर भरून आला होता.
डी गुकेश हा त्याच शाळेचा विद्यार्थी आहे जिथून देशाला विश्वनाथन आनंदसारखे खेळाडू मिळाले आहेत. गुकेशने त्याच्याच शाळेत शिकणाऱ्या आणि ग्रँडमास्टर असलेल्या प्रज्ञानंदला पाहून बुद्धिबळ खेळायला सुरुवात केली होती. त्यावेळी प्रज्ञानंद अंडर – 10 चॅम्पियन होता. प्रज्ञानंदप्रमाणेच गुकेशनेही लहान वयातच ठरवले होते की आता बुद्धिबळ हेच आपले ध्येय आहे. याच कारणामुळे त्याने चौथीनंतर नियमित शाळेत जाणे बंद केले आणि संपूर्णपणे बुद्धिबळवर लक्ष केंद्रीत केले. गुकेशच्या स्वप्नासाठी त्याच्या आई-वडिलांनीही सर्वस्व पणाला लावले.
लहान असलेल्या गुकेशला घेऊन त्याचे वडिल प्रत्येक टूर्नामेंटला जायचे. महिन्यातील 15 दिवस गुकेशबरोबर प्रवास करून उर्वरित 15 दिवस शस्त्रक्रिया करत होते. गुकेशबरोबर सतत प्रवास करत असल्याचा त्यांच्या करिअरवरही परिणाम झाला. पण ते आपल्या मुलासाठी सर्वकाही करण्यासाठी तयार होते. गुकेशने 2015 मध्ये आशियाई शालेय बुद्धिबळ स्पर्धा जिंकली. त्याने 2018 मध्ये 12 वर्षांखालील जागतिक युवा बुद्धिबळ स्पर्धा जिंकली. 2018 च्या आशियाई युवा बुद्धिबळ स्पर्धेत त्याने 5 सुवर्णपदकं जिंकली.
फ्रान्समधील 34 वी ओपन डी कॅपेले ला ग्रँड बुद्धिबळ स्पर्धा झाल्यानंतर मार्च 2018 मध्ये तो आंतरराष्ट्रीय ग्रँडमास्टर बनला. 2019 पर्यंत तो जगातील सर्वात तरुण ग्रँडमास्टर होता. तर भारताचाही सर्वात तरुण ग्रँडमास्टर देखील गुकेश आहे. आपल्या मुलाच्या स्वप्नासाठी आपले करिअर आणि घेतलेले परिश्रम गुकेशने सार्थकी लावून आपल्या आई – वडिलांची मान उंचावली आहे.