पुणे : पुण्यातील पोर्शे कार अपघातात दाेन जणांचा दुर्देवी मृत्यू झाला आहे. अल्पवयीन असल्याने अपघात करणाऱ्या मुलाला तत्काळ जामीनही मंजूर करण्यात आला. पोलिसांनी या प्रकरणी आरोपी किशोरच्या वडिलांना अटक केली आहे. या शिवाय पोलिसांनी कोजी रेस्‍त्राच्या मालक प्रल्‍हाद भुटाडा आणि मॅनेजर सचिन काटकर आणि हॉटेल ब्‍लॅक चा मॅनेजर संदीप सांगले यांनाही अटक केली आहे.

आता या घटनेत पोलिसांकडून एक खुलासा समोर आला आहे. या घटनेतील आरोपी अल्‍पवयीन मुलाने त्‍याच्या वेगवान पोर्शे कारने दोघांना उडवायच्या आधी एका पबमध्ये पार्टी केली होती. या अपघाताच्या आधी त्‍याने एका पबमध्ये तब्‍बल 48 हजार रूपये खर्च केले होते. पोलिसांनी दावा केला आहे की, त्‍या मुलाने अपघाताच्यावेळी दारू प्राशन केली होती.

मिळालेल्‍या माहितीनुसार, पुण्यातील एका प्रसिद्ध बिल्‍डरच्या 17 वर्षीय मुलाने पबमध्ये जाऊन 90 मिनिटात 48 हजार  रूपये खर्च केले. यानंतर रविवारी सकाळी त्‍याने त्‍याच्या पोर्शे टेकन कारने एका दुचाकीला धडक मारली. या अपघातात एक युवक आणि युवतीचा मृत्‍यू झाला. पुण्याचे पोलिस आयुक्‍त अमितेश कुमार यांनी सांगितले की, अल्‍पवयीन मुलाने 48 हजार रूपयांचे बिल कोजी या पबमध्ये भागवले आहे. किशोर आणि त्याचे मित्र हे शनिवारी रात्री 10 वाजून 40 मिनिटांनी या पबमध्ये आले होते. त्‍यावेळी त्‍यांचे 48 हजार इतके बील झाले.ज्‍याचे पैसे अल्‍पवयीन मुलाच्या ड्रायव्हरने भरले होते. बिलामध्ये किशोर आणि त्‍याच्या मित्रांना देण्यात आलेल्‍या दारूचाही समावेश आहे.