कौलव (प्रतिनिधी) : राधानगरी मतदारसंघात असं गाव नाही तिथे प्रकाश आबीटकर यांच्या विकासाचं नाव पोहचलं नाही. आमदार प्रकाश आबीटकर राधानगरी मतदार संघाच्या विकासासाठी अहोरात्र झटत आहेत. त्यामुळेच त्यांच्या विजयाची जबाबदारी आता जनतेनेच घेतली असल्याचे प्रतिपादन शेतकरी संघटनेचे नेते प्रा.जालिंदर पाटील यांनी केले. ते कौलव (ता.राधानगरी) येथे महायुतीचे उमेदवार आमदार प्रकाश आबिटकर यांच्या प्रचारादरम्यान प्रमुख कार्यकर्त्यांच्या बैठकीत बोलत होते.

प्रा. जालिंदर पाटील म्हणाले, शेतकऱ्यांच्या आणि बहिणींच्या, तसेच वंचित घटकांच्या चेहऱ्यावर हसू फुलवायचे काम महायुती सरकारने तसेच आमदार प्रकाश आबिटकर यांनी केले आहे. एका बाजुला राजकीय घरानी विरोधात उतरलेली आहेत. मात्र, सामान्य कष्टकरी जनतेच्या व विकासाच्या वळणावर आमदार आबिटकर यांनी केलेल्या कामाची दखल घेऊन त्यांना मुक्तहस्ते पाठींबा देण्याचा निर्णय घेतला आहे. वाडा संस्कृती विरोधी सातत्याने शेतकरी संघटना गाव गाड्याच्या भविष्यासाठी काम करते तो गाव गाडा सुंदर करण्याचे काम आमदार प्रकाश आबिटकर यांनी केले आहे. विकास प्रक्रियेमध्ये महत्वपुर्ण योगदान दिल्याबद्दल पक्ष, गट-तट विसरुन दिलेला पाठींबा निश्चित सार्थकी लागेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

यावेळी प्रकाश आबिटकर म्हणाले, राधानगरी मतदार संघातील जनता विकासाला साथ देणारी आहे. मतदार संघाच्या विकासासाठी तन-मन अर्पुण काम केले आहे. त्यामुळेच हजारो कोटी रुपयांचा निधी मतदार संघाच्या विकासासाठी आणु शकलो आहे. मतदार संघातील धामणी, झापाचीवाडी, आप्पाचीवाडी, सर्फनाला, नागणवाडी, मेघोली यासह विविध लघु प्रकल्प मार्गी लावले. यामुळे शेतकऱ्यांची हजारो एकर शेतीवर हिरवे सोने पिकणार आहे. शेतकऱ्यांच्या जीवनात आर्थिक समृध्दी येणार असल्याने ऊर आनंदाने भरुन येतो.

यावेळी राधानगरी तालुकाध्यक्ष रंगराव पाटील, पांडुरंग जरग, करवीर तालुकाध्यक्ष विलास पाटील, तंबाखू संघाचे उपाध्यक्ष रावसाहेब डोंगळे, संजय देसाई, शंकर जाधव, गंगाराम पाटील, कृष्णात मोगणे, तुकाराम जरग यांनी भाषणे केली.

शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष जर्नादन पाटील यांनी शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते आमदार प्रकाश आबिटकर यांच्या विजयासाठी जिवाचे रान करतील असे आपल्या प्रस्ताविकात सांगितले.

यावेळी दत्तात्रय उगले, भिमराव गोनुगडे, शिवाजी पाटील, विजय पाटील, शंकर पाटील, रमाकांत तोडकर, शामराव टिपूगडे, शंकर जाधव, कृष्णा मेंगाणे, श्रीपती पोवार, गणेश व्हरकट आदींसह शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.