पॅरिस ऑलिम्पिक 2024 : महाराष्ट्राचा सुपुत्र कोल्हापूरचा ढाण्या वाघ  नेमबाज स्वप्नील कुसाळेने पॅरिस ऑलिम्पिक 2024 च्या 50 मीटर रायफल थ्री पोझिशनमध्ये 451.4 गुण नोंदवून भीम पराक्रम केला आहे. त्याने या स्पर्धेत कांस्यपदकाला गवसणी घातली. पुरुषांच्या 50 मीटर रायफल 3 पोझिशनमध्ये ऑलिम्पिक पदक जिंकणारा स्वप्नील कुसाळे या स्पर्धेत कांस्यपदक जिंकणारा पहिला भारतीय ठरला.

‘स्वप्नील’ असा पोहोचला कांस्यपदकापर्यंत

स्वप्नील कुसाळेने डावाची संथ सुरुवात केली. त्याने 153.3 (पहिली मालिका- 50.8, दुसरी मालिका- 50.9, तिसरी मालिका- 51.6) गुणांसह तो सहाव्या क्रमांकावर राहिला. यानंतर, प्रोनमध्ये त्याने 156.8 (पहिली मालिका – 52.7, दुसरी मालिका – 52.2, तिसरी मालिका – 51.9) स्कोअर करून आपली स्थिती सुधारली. प्रोननंतर तो पाचव्या क्रमांकावर पोहोचला होता. येथून स्वप्नीलने चमत्कार करण्याची सुरुवात केली.

स्वप्नील कुसाळेने पहिल्या मालिकेत 51.1 आणि दुसऱ्या मालिकेत 50.4 म्हणजेच एकूण 101.5 गुण मिळवले. म्हणजेच त्याचा एकूण स्कोअर 422.1 होता आणि तो तिसऱ्या स्थानावर पोहोचला. या नंतर त्याचे आव्हान आणखी गंभीर होत गेले पण यातही त्याने विचलित न होता एलिमिनेशनमध्ये कांस्यपदक पटकाविले. स्वप्नीलच्या या कामगिरीने कोल्हापूरसह संपूर्ण देशातून त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.

‘सुवर्ण’ चीनच्या लियू युकुनला तर ‘रौप्य’ कुलिस सेरीला

पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेचे सुवर्ण चीनच्या लियू युकुनने जिंकले.त्याने 463.6 गुण मिळवून केवळ विश्वविक्रमच केला नाही तर सुवर्णपदकही जिंकले. रौप्य पदक कुलिस सेरीला मिळाले, त्याने 461.3 गुण मिळवले.