मुंबई – पुष्पा: द रूल’ या चित्रपटाची प्रतीक्षा असंख्य प्रेक्षकांना आहे. ‘पुष्पा: द राइज’ या पहिल्या भागाने बॉक्स ऑफिसवर तगडी कमाई केली होती. यामध्ये अल्लू अर्जुन आणि रश्मीका मंदानाची जोडी प्रेक्षकांना खूप आवडली होती. ‘पुष्पा: द राइज’ या सिनेमातील सर्व गाणी आजही लोकांच्या तोंडात आहेत. त्यातलं समंथा प्रभूचा ‘ऊ अंटावा’ हे गाणं तुफान गाजलं होतं. त्यानंतर समंथा प्रभू पुष्पा २ मध्ये पण आयटम सॉंग करणार का ? याची उत्सुकता चाहत्यांना लागून राहिली होती. त्याचं उत्तर आता मिळालं आहे. या दुसऱ्या भागात बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री आयटम साँग करणार असल्याची माहिती समोर येत आहे.

‘पुष्पा: द रुल’मध्येही धमाकेदार आयटम साँग असणार आहे. मात्र त्यात समंथा नाही तर दुसरी अभिनेत्री झळकणार आहे. सुरुवातीला अभिनेत्री दिशा पटानीच्या नावाची चर्चा होती. मात्र दिशा नव्हे तर ‘ॲनिमल’ फेम तृप्ती डिमरी यामध्ये आयटम साँग करणार असल्याचं कळतंय. येत्या जून महिन्यात या गाण्यासाठी शूटिंग करण्यात येणार आहे. त्यासाठी स्पेशल सेटसुद्धा तयार केला जातोय. संदिप रेड्डी वांगा दिग्दर्शित ‘ॲनिमल’ या चित्रपटानंतर तृप्तीला रातोरात लोकप्रियता मिळाली. ‘नॅशनल क्रश’ म्हणून ती सोशल मीडियावर प्रसिद्ध झाली. हा चित्रपट तिच्या करिअरसाठी खूपच खास ठरला होता. सध्या ती कार्तिक आर्यनसोबत ‘भुलभलैय्या 3’ या चित्रपटासाठी शूटिंग करतेय. याशिवाय ती एका रोमँटिक चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. तृप्तीच्या हाती आणखी एक प्रोजेक्ट लागला असून त्यात ती राजकुमार राव आणि विकी कौशलसोबत काम करणार आहे.