चिपळूण (प्रतिनिधी) : आधुनिक महाराष्ट्राच्या विजेच्या स्वयंपूर्ततेसाठी कोयना विद्युत प्रकल्पाचे योगदान महत्त्वाचे आहे. आगामी काळात या प्रकल्पाच्या आधुनिकीकरणासाठी आवश्यक असणाऱ्या बाबींसाठी शासन सर्वतोपरी मदत करेल असा विश्वास मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी गुरूवारी कोयना विद्युत प्रकल्प टप्पा चार विद्युतगृहाच्या पाहणी दरम्यान व्यक्त केला.

कोयना जलविद्युत प्रकल्प हा महाराष्ट्रातील सर्वात मोठा जलविद्युत प्रकल्प आहे. कोयना नदीवर धरण बांधून पाणी आडविले आहे. या प्रकल्पाचे चार टप्पे आहेत. जास्त मागणीच्यावेळी सर्व मिळुन या टप्प्यातून १९२० मेगावॅट वीज निर्मिती केली जाऊ शकते. हेळवाक जवळील देशमुखवाडी येथे या प्रकल्पाचा चौथाटप्पा तयार करण्यात आला आहे. सह्याद्री डोंगराच्या पोटात ३०० मीटर खोलीवर हा टप्पा आहे. या टप्प्यातून लेक टॅपिंग पध्द्तीने १००० मेगावॉट वीज निर्मिती केली जाते. जलविद्युत केंद्राच्या पाहणीच्यावेळी प्रकल्पाविषयीचे सादरीकरण करण्यात आले. पाहणी वेळी मुख्यमंत्र्यांनी अनेक तांत्रिक बाबी अभियंत्यांकडून माहिती करून घेतल्या.