गगनबावडा (प्रतिनिधी) : कुंभी सरस्वती आणि धामणी नदीकाठचा पूर ओसरल्याने नागरिक आपापल्या परीने पिके वाचवण्याच्या तयारीला लागले आहेत. पूर ओसरला असला तरी नदीकाठच्या लोकांना आता अनेक समस्यांचा सामना करावा लागत आहे. त्यातून सावरण्यासाठी त्यांना बराच वेळ लागणार आहे. त्यामुळे शासनाने मदतीचा हात आखडता घेऊ नये, अशी मागणी होत आहे.

यावर्षी वादळी वाऱ्यासह पाऊस आणि त्या पावसाच्या पुरामुळे पडझड होऊन अनेकांचे संसार उघड्यावर आले आहेत. पुरामुळे पिके पाण्यात बुडल्याने कुजू लागले आहेत. अनेक पिके अजूनही पाण्याखाली आहेत. ज्या जनावरांच्या जीवावर दुधाद्वारे उपजीविकास सुरू होती अशा अनेक शेतकऱ्यांची वैरन कुजून गेली असल्यामुळे शेतकऱ्यापुढे जणावरे जगवायची कशी असा प्रश्न उपस्थित झाला आहे. तसेच अनेकांची घरे, जनावरांचे गोठे पडझडीमध्ये जमिनदोस्त झाली आहेत. त्यामध्ये अंशत पडझडझालेल्या घरांची संख्या ४३ असून जनावरांची गोठे ७ असे एकूण ५० घरांचे गोठ्यांची पडझड झाली आहे.

तर अनेक गावात पिण्याचे पाणीही अद्याप नाही. काही भागात लाईट नसून सर्वत्र घाणीचे साम्राज्य आहे. त्यामुळे रोगराई पसरण्याची भीती आहे. शासनाकडून भरपाई कधी मिळणार आणि मोडलेला संसार पुन्हा जोमाने कधी उभारणार असा प्रश्न पूरग्रस्तांसमोर उभा राहिला आहे.