मुंबई : संगीसृष्टीमधुन अत्यंत दु:खद बातम्या समोर येताना दिसत आहे. प्रसिद्ध तबलावादक झाकीर हुसैन यांचे रविवारी 15 डिसेंबरला रात्री दीर्घ आजाराने निधन झाले. तर आता आणखी एक धक्का संगीतसृष्टीला बसला आहे. गायक पंडित संजय राम मराठे यांचे निधन झाल्याची बातमी समोर आली आहे. संगीत भूषण पंडित राम मराठे यांचे ज्येष्ठ सुपुत्र आणि मुकुंद मराठे यांचे ज्येष्ठ बंधू, ज्येष्ठ गायक, हार्मोनियम वादक संजय राम मराठे यांचे रविवारी 15 डिसेंबरला रात्री 9.55 वाजता हृदयविकाराचा तीव्र झटका आल्याने त्यांचे दुःखद निधन झाले आहे ते 68 वर्षांचे होते.

पंडित संजय राम मराठे यांना हृदयविकाराचा झटका आल्याने त्यांना ठाण्यातील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. पण त्यांचा उपचारा दरम्यान निधन झाल्याची माहिती कुटुंबीयांनी दिली. पंडित संजय मराठे यांनी भारतीय शास्त्रीय संगीत आणि रंगभूमीचा वारसा जपलेला आहे. त्यांनी आपल्या हार्मोनियम आणि सुरेल आवाजाने त्यांनी जगभरात आपली वेगळी ओळख निर्माण केली होती. त्यांना देश-विदेशातील अनेक मोठे सन्मान त्यांना मिळालेले आहेत.