छत्रपती संभाजीनगर : वडील लग्न लावून देत नाहीत म्हणून दोन मुलांनी बापावर चाकूने वार करत खून केल्याची घटना घडली आहे. छत्रपती संभाजीनगर  जवळच्या वडगाव कोल्हाटी इथे ही घटना घडली. 48 वर्षीय संपत वाहूळ असं उपचारादरम्यान मृत्यू झालेल्या व्यक्तीच नाव आहे. तर पोपट वाहूळ आणि प्रकाश वाहूळ अशी या प्रकरणी पोलिसांनी ताब्यात घेतलेल्यांची नावे आहेत. या प्रकरणी वाळूज एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय. 

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार,  संपत वाहुळ हा 48 वर्षीय व्यक्ती वडगाव कोल्हाटी येथे आपल्या कुटुंबासह राहत होते. त्यांचा मुलगा पोपट  वाहुळ (28) आणि प्रकाश वाहुळ (26) ही दोन्ही मुले  एका कंपनीत काम करत होती. तर वाहुळ यांच्या नावावर शेती होती. 8 मे रोजी संध्याकाळी साडेसातच्या दरम्यान लहान मुलगा प्रकाश कामावरून घरी आला. त्यावेळी वडील संपत वाहुळे हे घरात एकटेच होते. कामावरून घरी आलेला प्रकाश रागात होता. कामावरून आल्याबरोबर त्याने शिवीगाळ करण्यास सुरुवात केली आणि नंतर बुटाने वडिलांना मारहाण केली. त्यानंतर मोठा मुलगा पोपट देखील कामावरून आला. त्याने देखील वडिलांना आमचे वय वाढत आहे, तरी सुद्धा आमच्या लग्नाचे मनावर का घेत नाही, अशी विचारणा केली. त्यावर वडिलांनी तुम्ही दोघेही नीट वागत नाही, असे सांगितले. 

वडिलांचे असे म्हटल्यावर दोन्ही मुलांचा राग अनावर झाला. मोठा मुलगा प्रकाशने जवळील चाकू काढत वडिलांवर सपासप वार केले. दोन्ही मुले बापावर तुटून पडले बापाने स्वतःला वाचवण्याचा प्रयत्न केला. जीव वाचवण्यासाठी ते बाहेर पळाले तर मोठ्या मुलाने पकडले आणि लहान मुलाने त्यांच्यावर वार केले. आरडा ओरड ऐकून संपत वाहुळ यांचे भाऊ रामनाथ वाहुल, संजय वाहुळ, आकाश व संदीप वाहुळ हे मदतीस धाऊन आले, त्यावेळी हा आता वाचला तर गोळी घालून मारून टाकू अशी धमकी मुलांनी दिली.  यामध्ये ते रक्तबंबाळ  झाले.  त्यानंतर संपत वाहुळ यांना घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र रात्री 11.30 वाजता त्यांचा मृत्यू झाला. या घटनेनंतर परिसरात मुलांच्या कृत्याबद्दल संताप तर वडिलांसाठी हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.