कोल्हापूर ( प्रतिनिधी ) : आपल्याला आवडेल असं एखादं दुर्मिळ किंवा जुनं पुस्तक अचानक समोर आलं आणि त्याची किंमत तुम्हीच ठरवा व जवळ ठेवलेल्या पेटीत टाका! ” अशी वेगळी योजना पुस्तकप्रेमींसाठी कोणी समोर आणली तर? महाद्वार रस्त्यावरील महाराष्ट्र ग्रंथ भांडार 4 फेब्रुवारी ते 31 मार्च 2025 या कालावधीमध्ये राबविणार आहे.

रथसप्तमीचा दिवस म्हणजे महाराष्ट्र ग्रंथ भांडारकर वर्धापनदिन. मंगळवार दि. 4 फेब्रुवारी 2025 रोजी या ग्रंथ विक्री केंद्र व प्रकाशन संस्थेला 89 वर्षे होत आहेत. या पार्श्वभूमीवर साहित्य प्रसाराचा आगळा ऊपक्रम राबविला जाणार आहे.

यासंदर्भात अधिक माहिती देताना नीलांबरी कुलकर्णी व ॠतुपर्ण कुलकर्णी यांनी सांगितले की_महाराष्ट्र ग्रंथ भांडार च्या आजवरच्या वाटचालीत कथा, कविता, कादंबऱ्या, धार्मिक, आध्यात्मिक यासह विविध विषयांवरील जुनी व दुर्मिळ पुस्तके दुकानाच्या संग्रही जमा झाली आहेत. ही पुस्तके जाणकार, जिज्ञासू वाचन प्रेमींपर्यंत जावी अशी आमची मनापासून इच्छा आहे. काही वेळेला एखादं पुस्तक वाचनप्रेमीला हवे असते, पण त्या पुस्तकाची किंमत खिशाला परवडणारी असतेच असे पुस्तकनाही. जुनी, दुर्मिळ पुस्तके व वाचन प्रेमी यांच्यामध्ये पैशांचा अडसर राहू नये यासाठी आम्ही 4 फेब्रुवारी ते 31 मार्च 2025 या कालावधीत “पुस्तक आवडेल ते आणि किंमत तुम्ही ठरवाल ती! ” अशी योजना राबविणार आहोत. या योजनेतील हवे ते पुस्तक पुस्तकप्रेमीने निवडावे आणि आपल्याला योग्य वाटेल त्या किंमती इतके पैसे शेजारी ठेवलेल्या पेटीत टाकून पुस्तक घेऊन जावे अशी ही योजना आहे. पुस्तक प्रेमींनी या योजनेचा लाभ अवश्य घ्यावा! “