कळे (प्रतिनिधी) : भाषेला ट्रान्सलेटर असतो पण कर्तुत्वाला ट्रान्सलेटर नसतो, कर्तुत्व हे स्वतः सिद्ध करावे लागते. त्यासाठी महापुरुषांच्या चरित्राचे वाचन आणि त्यावर मनन करणे आवश्यक असते. तसेच ध्येयाने झपाटून जावे लागते. आई-वडिल हेच आपले आद्य दैवत असून त्यांना कधीही दुःख देऊ नका असे प्रतिपादन प्रसिद्ध लेखक आणि व्याख्याते शरद तांदळे यांनी केले. 

ते कळे विद्यामंदिर आणि ज्युनिअर कॉलेज कळे या प्रशालेत आयोजित स्नेहसंमेलन कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. अध्यक्षस्थानी पन्हाळा एज्युकेशन सोसायटी गव्हर्निंग कौन्सिलचे अध्यक्ष  ऍड.गिरीश नानिवडेकर होते. 

स्वागत आणि प्रास्ताविक प्रशालाचे प्राचार्य ए.बी. गायकवाड यांनी केले. अहवालवाचन प्रा.एस.वाय.कदम यांनी केले. पाहुण्यांचा परिचय प्रा.एस.एस.खांबे यांनी करून दिला. क्रीडा शिक्षक वाय.एस.वराळे यांनी क्रीडा स्पर्धेचा निकाल जाहीर केला. स्पर्धेतील विजेत्यांना जनरल चॅम्पियनशिप आणि  रनरशिप बक्षीसे देऊन गौरविण्यात आले. रेणू विलास माळवे या इ.१२वी. च्या वर्गात शिकत असणाऱ्या विद्यार्थिनीला पन्हाळा एज्युकेशन सोसायटी गव्हर्निंग कौन्सिलचे उपाध्यक्ष माधव गुळवणी यांच्याकडून  “शीलविद्यासेवा विकसन” पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. तसेच इ.१० वी मध्ये शिकत असणारी विद्यार्थिनी अफ्रिन मुख्तार शेख हिला चित्रतपस्वी कै. भालजी पेंढारकर उत्तम विद्यार्थी पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. 

यावेळी माध्यमिक विभागाच्या “अक्षरगंध” आणि उच्च माध्यमिक विभागाच्या “ज्ञानामृत” या हस्तलिखितांचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.  कार्यक्रमास पन्हाळा एज्युकेशन सोसायटी गव्हर्निंग कौन्सिल उपाध्यक्ष माधवराव गुळवणी, संस्थेचे  सेवानिवृत्त प्राचार्य आणि गव्हर्निंग कौन्सिल सदस्य आर.के.कुलकर्णी, गव्हर्निंग कौन्सिल सदस्य विनायक गोलीवूडेकर, कळेचे सरपंच सुभाष पाटील, पन्हाळा विद्यामंदिरच्या मुख्याध्यापिका व्ही.पी.जमदग्नी, सेवानिवृत्त ज्येष्ठ शिक्षक एम.एस.कालेकर, यांच्यासह सर्व शिक्षक – शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी, पालक आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.