देवगड (प्रतिनिधी) : सांगली येथून पतीशी भांडण करून जीवाचे बरेवाईट करून घेण्यासाठी देवगड येथे आलेल्या विवाहित महिलेला देवगड पोलिस ठाण्याच्या महिला पोलिस हेड कॉन्स्टेबल अन्विता कदम, महिला पोलिस कॉन्स्टेबल दर्शना देवगडकर, पोलिस कॉन्स्टेबल सागर चौगुले यांच्या तत्परतेमुळे सुखरूप नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले. या घटनेमुळे देवगड पोलिस ठाण्याच्या महिला कर्मचाऱ्यांचे कौतुक होत आहे.
सांगली येथील २७ वर्षीय विवाहित महिला घरी पतीशी भांडून शुक्रवारी आपल्या जीवाचे कमीजास्त करून घेणार आहे. असे सांगून ती ८ ऑगस्ट रोजी सांगलीतील घरातून बाहेर निघून गेली होती. या संदर्भात सांगली येथील माजी महिला नगरसेविकाीने तिचे लोकेशन देवगड एसटी स्टॅण्ड परिसरात मिळत असल्याचे सांगितले. यावेळी देवगडचे पोलीस निरिक्षक अरुण देवकर यांच्य मार्गदर्शनाखाली ठाणे अंमलदार महिला पोलिस हेड कॉन्स्टेबल अनविता कदम, दर्शना देवगडकर, आणि पोलीस कॉन्स्टेबल सागर चौगुले यांना या महिलेच्या शोधासाठी रवाना करण्यात आले.
यावेळी पोलीसांनी देवगड एसटी स्टॅण्ड येथे जाऊन तिचा फोटोद्वारे शोध घेतला. तसेच सीसीटिव्ही कॅमेरे तपासून पाहिले असता तिचा शोध लागला नाही. पोलीसांनी अधिक चौकशी केली असता ती महिला एका कॉम्प्लेक्सच्या बाजूला एका घरात सुस्थितीत असल्याची माहिती मिळली. तिला तेथे जावून ताब्यात घेतले आणि पोलिस स्थानकात आणून तिची चौकशी केली. तसेच तिच्या नातेवाईकांना याबाबत कळवले. सांगलीहून रात्री उशिरा.नातेवाईक येताच तिला त्यांच्या ताब्यात देण्यात आले.