मुंबई (प्रतिनिधी) : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे धाकटे चिरंजीव तेजस ठाकरे यांनी सह्याद्रीच्या पर्वत रांगात माशाची चौथी नवीन प्रजाती शोधून काढली आहे. अंबोली घाटातील हिरण्यकेशी नदीत सोनेरी रंगाचे केस असणारा माश्याची नवी प्रजाती तेजस यांनी शोधली आहे. या माश्याची ही २० वी प्रजाती तर तेजस यांनी शोधलेली चौथी प्रजाती आहे. या आधी त्यांनी सह्याद्रीच्याच पर्वत रांगात पालींच्या दुर्मिळ प्रजाती शोधून काढल्या होत्या.
हिरण्यकेशी नदीत शोधलेल्या या नव्या प्रजातीच्या माशाचे नाव ‘हिरण्यकेशी’ असे ठेवण्यात आले आहे. याचा संस्कृत अर्थ सोनेरे रंगाचे केस असणारा असा आहे. माश्याच्या या नवीन प्रजातींना शोधण्यासाठी तेजस यांना अंडर वॉटर फोटोग्राफर शंकर बालसुब्रमण्यम आणि डॉक्टर प्रवीणराज जयसिन्हा यांचे सहकार्य मिळाले.