मुंबई (प्रतिनिधी) : महाराष्ट्राची कुलस्वामिनी ‘आई तुळजाभवानी’ या मालिकेत आत्तापर्यंत देवीची अनेक रूपे पहायला मिळाली आहेत. जय मल्हार या मालिकेमधून म्हाळसा देवीची भूमिका साकारलेली सुरभी हांडेची ‘आई तुळजाभवानी’ मालिकेत प्रेक्षकांना दिसणार आहे. या मालिकेतही म्हाळसा हे पात्र सुरभी हांडे साकारणार आहे.

सुरभी हांडे म्हाळसा या भूमिकेबद्दल काय म्हणाली..?

हांडे म्हणाली, तब्बल 10 वर्षाने म्हाळसा आता परत सर्वांसमोर येत आहे याचा आनंद आहे. म्हाळसाला बघायला प्रेक्षकांना जसं आवडतं तसेच ते पात्र साकारायला मला आवडते. हे पात्र माझ्यासाठी नेहमीच खास होते. आता ‘आई तुळजाभवानी’ या पात्राच्या माध्यमातून मला म्हाळसाला न्याय देण्याची एक चांगली संधी मिळाली आहे.

सुरभी पुढे म्हणाली, ‘आई तुळजाभवानी’ सह म्हाळसा जेव्हा असुरांसोबत युद्ध करते असा सीन शूट करताना मला वाटत होते की, दोन स्त्रीशक्ती कोणासोबत तरी लढत आहेत. पूजासोबत काम करताना खूप छान वाटले.तिचंही कौतुक वाटले. ‘आई तुळजाभवानी’ मालिकेत म्हाळसा हे पात्र साकारण्याची संधी दिल्याबद्दल ‘कलर्स मराठी’ आणि बहुरुपी प्रोडक्शनचे आभारही सुरभी हांडेने मानले आहेत. ‘आई तुळजाभवानी’ मालिकेच्या कथेने वेग पकडला असून असुरांपासून भक्तांचे रक्षण करण्यासाठी म्हाळसा तुळजाला पाठिंबा देताना मालिकेत दिसून येणार आहे.