नांदेड (प्रतिनिधी) : उसाच्या गाळप हंगामावर कोरोनाचे सावट कायम आहे. तरीही राज्यातील अनेक साखर कारखान्यांचे बॉयलर पेटवण्यात येत आहेत. काही कारखाने सुरुही झाले पण अतिवृष्टीमुळे यंदाचा गाळप हंगाम लांबण्याची शक्यता आहे. अशावेळी राज्य सरकार आणि बँका साखर कारखान्यांना लागेल ते सहकार्य करतील, असे आश्वासन सहकारमंत्री बाळासाहेब पाटील यांनी दिली. 

कराडमधील सह्याद्री सहकारी साखर कारखान्याच्या बॉयलर पाटील यांच्या हस्ते पेटवण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते. ते म्हणाले, गेल्या हंगामात सर्वच साखर उद्योगावर कोरोनाचा परिणाम झाला. कारखान्यांचे कामगार, ऊसतोड मजूर आणि शेतकऱ्यांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला होता. लॉकडाऊनमुळे वाहतूक यंत्रणेवरही परिणाम झाला होता. मात्र अशा स्थितीतही मागचा हंगाम पार पडला. राज्यातील अडचणीतील कारखान्यांना थकहमी देऊन ते सुरु करण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. त्यामुळे हे कारखाने सुरु करुन, राज्यातील सर्व उसाचे गाळप होईल. जास्त कारखाने सुरु झाल्यास ऊसतोड कामगारांची कमतरता भासण्याची शक्यता आहे.