कळे (प्रतिनिधी) : महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद पुणे यांच्यामार्फत घेण्यात आलेल्या राज्यस्तरीय व्हिडीओ निर्मिती स्पर्धेत प्राथमिक विभागामध्ये पोहाळेवाडीतील विद्या मंदिर शाळेचे पदवीधर अध्यापक आणि जिल्हा आदर्श पुरस्कार प्राप्त शिक्षक सुभाष नारकर यांचा तालुका व जिल्हास्तरावर प्रथम क्रमांक आला. त्यांना रोख बक्षीस, स्मृतिचिन्ह व प्रशस्तीपत्र देऊन त्यांचा गौरव करण्यात आला.
महाराष्ट्र शासनाच्या वतीने आयोजित राज्यस्तरीय या व्हिडीओ निर्मिती स्पर्धेमध्ये त्यांनी इयत्ता ३ री ते ५ वी या गटामध्ये इयत्ता ५ वी इंग्रजी विषयाचा शाळेतील विद्यार्थीनी श्रेया भोगले या विद्यार्थीनीचा सहभाग घेऊन हा व्हिडीओ बनविला. या स्पर्धेचे मूल्यमापन आयटी तज्ज्ञ आप्पाराव पाटील आणि सर्जेराव पाटील यांनी केले.
यावेळी जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य डॉ. राजेंद्र भोई, करवीरचे गट शिक्षणाधिकारी समरजित पाटील, डॉ.अंजली रसाळ, महादेव वांडरे, वैशाली पाटील, तुकाराम कुंभार, चंद्रहास हिप्परकर, राणीताई पाटील, सरिता कुदळे आदी उपस्थित होते.