कोल्हापूर (प्रतिनिधी) : अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यानी केवळ शिक्षित होण्यापेक्षा कुशल होणे आवश्यक आहे. कोणत्याही गोष्टीचे अर्धवट किंवा वरवरचे ज्ञान हे खूपच धोकादायक असून आपण जे क्षेत्र निवडले आहे त्याचे परिपूर्ण ज्ञान मिळवावे. ‘टेक्नोत्सव’मुळे विद्यार्थ्यांमधील अभियांत्रिकी व तांत्रिक कौशल्य यासाठी मोठे व्यासपीठ उपलब्ध झाले आहे, असे प्रतिपादन प्राज इंडस्ट्रीज पुणेचे जॉईट जनरल मॅनेजर मिलिंद बावा यांनी केले.

ते डी वाय पाटील अभियांत्रिकी महाविद्यालयातर्फे आयोजित तीन दिवसीय “टेक्नोत्सव २०२४” या राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेच्या उद्घाटन समारंभात प्रमुख पाहुणे म्हणून बावा बोलत होते.

बावा म्हणाले की, आपल्या आयुष्यातील हि चार वर्षे म्हणजे एक सुवर्णसंधी म्हणून पाहिले पाहिजे. या काळात केवळ शिक्षण न घेता ज्ञान आणि आभियांत्रिक व तांत्रिक कौशल्ये आत्मसात करा. आपल्या जीवनामध्ये असे काही करा की आपल्या पालकांना आपला अभिमान वाटला पाहिजे. शाश्वत विकास फार महत्त्वाचा असून त्यासाठी आपले ध्येय आजचा निश्चित करून त्या दिशेने वाटचाल करा. आयुष्यात यशस्वी होण्यासाठी भावनांवर विजय मिळवणे संवाद कौशल्य आत्मसात करणेही तेवढेच महत्वाचे असल्याचे सांगितले.

प्राचार्य डॉ. संतोष चेडे यांनी, टेक्नोत्सव सारख्या उपक्रमांमधून क्रिएटिव्हिटी आणि आंतरशाखीय संशोधनाला चालना मिळेल. मात्र, केवळ उत्तम नवकल्पना आणि सर्जनशीलता असून उपयोग नाही तर ती ओळखून त्याचे व्यावसायिकीकरण करणे महत्त्वाचे असल्याचे त्यानी सांगितले.

डॉ. के. टी. जाधव म्हणाले, पर्यावरण पूरक समस्या सोडविण्यासाठी विद्यार्थ्यांना व्यासपीठ उपलब्ध करून देणे हा या स्पर्धेचा मुख्य उद्देश आहे. महाराष्ट्र, कर्नाटक, गोवा, गुजरात येथील विविध संस्थेचे विद्यार्थ्यानी या स्पर्धेत सहभाग घेतला आहे.

डी. वाय. पाटील प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ. संजय पाटील, उपाध्यक्ष आमदार सतेज पाटील, विश्वस्त आमदार ऋतुराज पाटील, कार्यकारी संचालक डॉ. ए.के. गुप्ता यांच्या मार्गदर्शनाखाली या राष्ट्रीय स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.