कोल्हापूर (प्रतिनिधी): जिल्ह्यात रेशीम शेती उद्योगासाठी खूप वाव आहे.रेशीम शेतीचे महत्व व त्यातून मिळणाऱ्या शाश्वत उत्पन्नाची शेतकऱ्यांना माहिती व्हावी याकरीता जिल्ह्यात महारेशीम अभियान-२०२५ राबविण्यात येत आहे.या अभियानाच्या माध्यमातून जिल्ह्यात रेशीम उद्योग वाढीसाठी प्रयत्न करावेत, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी केले. या अभियानानिमित्त जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते महारेशीम अभियान रथाला हिरवा झेंडा दाखवून याचा शुभारंभ करण्यात आला.
जिल्हाधिकारी म्हणाले, अभियान कालावधीत रेशीम शेती प्रचार प्रसिध्दीसह नवीन शेतकरी नोंदणी करण्यात येणार आहे. रेशीम संचालनालयाद्वारे ९ फेब्रुवारी पर्यंत २०२५ राबविण्यात येणाऱ्या या अभियान कालावधीत जिल्ह्यातील रेशीम उद्योग वाढीसाठी रेशीम विभागास 250 एकर, कृषी विभागास 300 एकर आणि जिल्हा परिषदेला 200 एकर असा 750 एकरचा लक्षांक देण्यात आलेला असून संबधित विभागांनी तो पूर्ण करून जिल्ह्यात रेशीम उद्योग वाढीसाठी आवश्यक कार्यवाही करण्याचे आदेश दिले.
यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी संजय तेली,जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी जालिंदर पांगारे,जिल्हा रेशीम विकास अधिकारी राजेश कांबळे,वरिष्ठ तांत्रिक सहाय्यक पी.जी.निकम, क्षेत्र सहाय्यक पी.बी.चंदनशिवे,कनिष्ठ सहाय्यक जे.बी.चव्हाण, तानाजी पाटील आदी उपस्थित होते.