कोल्हापूर (प्रतिनिधी) : ताराबाई पार्क प्रभागातील गोल्ड्स जीम समोरचा रस्ता अपघाताचे मुख्य केंद्र बनत असुन या रस्त्यावर नागरीकांना जीव मुठीत धरुनच प्रवास करावा लागत आहे. हा रस्ता वनवे असून याठिकाणी तातडीने पोलिसांची नेमणूक करावी आणि वन-वेची कडक अंमलबजावणी करावी, या मागणीचे निवेदन आज राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांच्या मार्गदर्शनानुसार शिवसेना उपशहरप्रमुख राज जाधव (भोरी) यांच्या नेतृत्वाखाली ताराबाई पार्क शिवसेनेच्यावतीने शहर वाहतुक नियंत्रण शाखेला देण्यात आले.

निवेदनात म्हणले आहे की, कोल्हापूर शहरातील ताराबाई पार्क प्रभागातील धैर्यप्रसाद चौक-गोल्डस जीम- छ.ताराराणी चौक हा रस्ता अपघाताचे केंद्र बनत आहे. धैर्यप्रसाद चौकातून गोल्डस जीमकडे येणारा आणि तिथुन ताराराणी चौक,  सदरबाजारकडे येणा-या रस्त्यावर अनेक वाहने दररोज भरधाव वेगाने येतात. या ठीकाणी अनेक वृद्ध, ज्येष्ठ नागरीक, चालण्यासाठी येत असतात. अशावेळी विरुद्ध बाजुने आलेल्या वाहनांमुळे अनेक छोटे-मोठे अपघात घङताना दिसत आहेत. काही दिवसांपुर्वी याच मार्गावर भरधाव कार आणि विरुद्ध दिशेने येणारी दुचाकीच्या धडकेमुळे एका नागरीकाला जीव गमवावा लागला आहे.

ही सर्व परीस्थीती लक्षात घेऊन या रस्त्यावर गतिरोधक करावा. येत्या २ दिवसात याठिकाणी बंदोबस्तासाठी पोलिस नेमावा,अशी मागणी आम्ही शिवसेना उपशहरप्रमुख राज जाधव यांच्या नेतृत्वाखाली ताराबाई पार्क प्रभागाच्या वतीने करीत असल्याचे म्हटले आहे.

यावेळी युवासेना शहरप्रमुख अॅड. चेतन शिंदे, अनिकेत राऊत उपस्थित होते.