काेल्हापूर (प्रतिनिधी) : मराठा समाजाला आरक्षण मिळावे, म्हणून गेले ३० वर्ष मराठा समाज मागणी करत आहे. मात्र, काही विघ्नसंतोषी लोकांमुळे आरक्षणाला स्थगिती मिळाली आहे. ही स्थगिती उठवून मराठा समाजाला लवकरात लवकर आरक्षण द्यावे, या मागणीचे निवेदन सकल मराठा समाज पन्हाळा तालुका यांच्या वतीने प्रांतअधिकारी अमित माळी व पन्हाळ्याचे तहसिलदार रमेश शेंडगे यांना दिले आहे.
दिलेल्या निवेदनात असे म्हटले आहे की, सर्वोच्च न्यायालयात तातडीने स्थगिती उठविण्यासाठी अर्ज दाखल करून त्यासाठी तज्ञ वकिलांची नेमणूक करावी, जोपर्यंत स्थगिती उठत नाही तोपर्यंत कोणतीही भरतीप्रक्रिया करू नये, कोरोना व मराठा आरक्षण स्थगिती उठेपर्यंत जो कालावधी वाया जाईल, तितका कालावधी मराठा समाजातील उमेदवारांना नोकरी भरतीसाठी वयोमर्यादा वाढवून मिळावी, मराठा आरक्षण दाखला व आर्थिक मागास आरक्षण दाखले तातडीने देण्यात यावे, अट्रॉसिटी कायद्यात बदल करण्यात यावा, सारथीसाठी ताबडतोब निधी देऊन त्यासाठी कायमस्वरूपी कर्मचारी वर्ग नेमावा, अण्णासाहेब पाटील आर्थिक महामंडळतर्फे कर्ज प्रकरणे तातडीने मंजूर करून करण्यासाठी सर्व बँकांना आदेश देण्यात यावे, मराठा क्रांती मोर्चा दरम्यान दाखल केलेले गुन्हे मागे घ्यावेत, मराठा क्रांती मोर्चा दरम्यान हुतात्मा झालेल्या वारसांना परिवहन खाते ऐवजी थेट शासकीय सेवेत घ्यावे, हे सर्व मागण्यांवर तातडीने निर्णय घेऊन मराठा समाजाला न्याय मिळावा. असे निवेदनात म्हटले आहे.
निवेदन देताना सकल मराठा समाजाच्या वतीने जयदीप पाटील, अमरसिंह भोसले, विशाल जाधव, विनायक बांदल, राहुल देशमुख, अमरसिंह पाटिल, नितीन माने, महेश कुराडे, मिलिंद कुराडे, राहुल भोसले, मंदार नायकवडी, मारूती माने, मनोज दळवी, पृथ्वीराज भोसले, अभय वाईंगडे, शुभम आडके उपस्थित होते.