जोतिबा (प्रतिनिधी) : लॉकडाऊन झाल्यापासून तिर्थक्षेत्रे आणि धार्मिक स्थळे प्रशासनाने बंद ठेवण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे संपूर्ण गुरव समाजाचा उदरनिर्वाह आणि उपजिवीकाचा प्रश्न उभा राहिला आहे. संपूर्ण महाराष्ट्रात तीस लाख गुरव समाज हा उपेक्षित राहिला असून प्रत्येक वेळी प्रत्येक सरकारने या समाजाच्या कोणत्याच मागण्या मान्य केल्या नाहीत. अशा अनेक मागण्यांचे निवेदन अॅड. आण्णासाहेब शिंदे यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन देण्यात आले.
यावेळी तीन वेळा आझाद मैदान येथे आंदोलन केले. शेकडो निवेदन दिली पण कोणताच ठोस निर्णय घेतला नाही. इनाम वर्ग तीन जमिनीधारक असंख्य गुरव समाजाचे लोक आहेत. पण पिक कर्ज देखील मिळत नाही. तसेच या निवेदनात, मंदिरे बंद असल्याने गुरव समाजाला अर्थ सहाय्य करावे, अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या इनाम जमीन तीनधारक असलेल्या गुरव समाजातील लोकांना नुकसान भरपाई मिळावी. देवस्थान ट्रस्टमध्ये पन्नास टक्के गुरव समाजाचे लोक असावेत, परंपरागत पुजाअर्चेचा आणि उत्पन्नाचा परंपरागत हक्क कायम ठेवावा अशा मागण्या करण्यात आल्या आहेत.
यावेळी गुरव समाज जिल्हाध्यक्ष रोहन गुरव, विलास पाटील, नेताजी गुरव, शिवप्रसाद गुरव, ओंकार सांगळे, मारूती सातार्डेकर, शिवम सांगळे, अशोक गुरव, आबासाहेब गुरव उपस्थित होते.