कुरुंदवाड ( प्रतिनिधी ) : छत्रपती ग्रुप महाराष्ट्र राज्याच्या वतीने आलास जिल्हा परिषद मतदारसंघातील गणेशवाडी, शेडशाळ, कवठेगुलंद, आलास, बुबनाळ, औरवाड, आणि गौरवाड या सात गावांमध्ये एसटी बससेवेच्या अनियमिततेमुळे होणाऱ्या गैरसोयीबाबत कुरुंदवाड आगार प्रमुखांना निवेदन देण्यात आले.

यावेळी बोलताना तालुकाप्रमुख संदीप पवार म्हणाले, आलास जिल्हा परिषद मतदारसंघातील सात गावांमध्ये एसटी बससेवेची अनियमितता नागरिकांसाठी गंभीर समस्या बनली आहे. विद्यार्थी शाळा-कॉलेजसाठी वेळेत पोहोचू शकत नाहीत, तर ज्येष्ठ नागरिक आणि महिलांनाही प्रवासात अडथळे येत आहेत.एसटी प्रशासनाने तातडीने कारवाई करून बससेवा नियमित करावी, अशी आमची ठाम मागणी आहे. ग्रामीण भागातील नागरिकांच्या सुविधांसाठी लढा देणे हे आमचे कर्तव्य असून या प्रश्नावर तोडगा निघेपर्यंत आम्ही शांत बसणार नाही असा इशारा दिला आहे.

या सात गावांमधील एसटी बससेवा वेळेवर आणि नियमित उपलब्ध नसल्यामुळे स्थानिक विद्यार्थ्यांना शाळा आणि महाविद्यालयात पोहोचण्यासाठी अडचणींचा सामना करावा लागत आहे. तसेच, ज्येष्ठ नागरिक, महिला, माता-भगिनींनाही आवश्यक सेवा मिळवताना अडथळ्यांचा सामना करावा लागत आहे. या समस्येचे गांभीर्य लक्षात घेऊन छत्रपती ग्रुपच्या वतीने कुरुंदवाड आगार प्रमुखांना निवेदन देण्यात आले. एसटी बससेवा नियमित करून तातडीने उपाययोजना करावी आणि नागरिकांची गैरसोय थांबवावी अशी मागणी करण्यात आली. ग्रामस्थांच्या वतीने छत्रपती ग्रुपच्या या पुढाकाराचे कौतुक करण्यात येत असून, एसटी प्रशासनानेही लवकरच या समस्येवर ठोस तोडगा काढण्याचे आश्वासन दिले.

यावेळी छत्रपती ग्रुपचे संस्थापक प्रमोद दादा पाटील, कार्याध्यक्ष अविनाश पाटील, दयानंद खनोरे, प्रदेशाध्यक्ष रोहित मलमे, शिरोळ तालुका प्रमुख संदीप भाऊ पवार, कुरुंदवाड शहर प्रमूख प्रदीप चव्हाण, संदीप पाटील, प्रमोदभाऊ पाटील, संदीप पाटील, सागर बिरणगे, प्रदीप चव्हाण, प्रमोद मलमे, प्रशांत कोळेकर , प्रकाश हाणबर, अशपाक ढालाईत, आदी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.