कोल्हापूर (प्रतिनिधी) : राज्यातील कोरोना रुग्णांची संख्या कमी होत असली, तरी साथ पूर्णपणे आटोक्यात आलेली नाही. साथीचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी सरकारकडून जाहीररित्या सण, समारंभ, मेळावे घेण्यावर उपस्थितीची मर्यादा घालण्यात आली आहे. त्यामुळे माजी खासदार राजू शेट्टी यांनी जरी प्रतिवर्षाप्रमाणे यंदा ऊस परिषदेसाठी परवानगी मागितली असली, तरी मर्यादित लोकांच्या उपस्थितीत आणि सोशल डिस्टन्सिंगचे नियम पाळूनच त्यांना ऊस परिषद आयोजित करता येईल, असे गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी स्पष्ट केले.

नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर आज (शुक्रवार) ना. देसाई यांनी करवीरनिवासिनी अंबाबाई मंदिर परिसरातील बंदोबस्ताची पाहणी केल्यानंतर त्यांनी माध्यम प्रतिनिधींकडे विविध विषयांवर मते व्यक्त केली. सुरुवातीस पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीच्या वतीनं देसाई यांचे स्वागत करण्यात आलं. देसाई यांनी मंदिर परिसरात असणाऱ्या दुकानदारांची चौकशी केली. या वेळी मंत्री देसाई यांनी मंदिरात न जाता गेटवरूनच अंबाबाईचं दर्शन घेतलं. राज्यातील कोरोनाचं संकट लवकर नष्ट होऊ दे, अशी प्रार्थना शंभूराज देसाई यांनी अंबाबाई चरणी केली.

श्री अंबाबाई मंदिरात चांगल्या पद्धतीने नियमांचे पालन होत आहे. कोरोनाची साथ पूर्णपणे आटोक्यात आलेली नाहीये. त्यामुळे मंदिरे उघडण्याची आग्रही मागणी होत असली, तरी नियम पाळूनच मंदिरे उघडण्यास परवानगी देतील का, याचा विचार शासनाकडून केला जात आहे. अर्थात, याबाबतचा निर्णय मुख्यमंत्रीच घेतील, असे त्यांनी सांगितले. एकनाथ खडसे हे उत्तर महाराष्ट्रातील दिग्गज नेते आहेत. त्यामुळे ते महाविकास आघाडीत येत आहेत, त्यामुळे त्यांचे स्वागतच आहे, असे त्यांनी सांगितले.

या वेळी देवस्थान समितीचे अध्यक्ष महेश जाधव, सदस्य शिवाजीराव जाधव, राजेंद्र जाधव, सचिव विजय पोवार, सहसचिव सौ. शीतल इंगवले, व्यवस्थापक धनाजी जाधव, मिलिंद घेवारी यांच्यासह देवस्थान समितीचे पदाधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.