मुंबई (प्रतिनिधी) : मागील काही महिन्यांचे वेतन दिवाळीपूर्वी द्यावे, या मागणीसाठी वेतनासाठी संपावर जाण्याचा इशारा एसटी कर्मचाऱ्यांनी दिला होता. त्याचप्रमाणे जळगाव, रत्नागिरी जिल्ह्यातील दोन एसटी कर्मचाऱ्यांनी आत्महत्या केल्याचा प्रकार समोर आल्यानंतर मात्र सरकारला जाग आली आहे. परिवहन मंत्री अनिल परब यांनी दिवाळीपूर्वी कर्मचाऱ्यांना बोनस आणि दोन महिन्यांचा पगार देण्याची घोषणा केली आहे. यामुळे एसटी कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. परब यांनी आज (सोमवार) तातडीने पत्रकार परिषद घेऊन ही माहिती दिली.

परब म्हणाले की, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकार आर्थिक अडचणीत आहे. प्रवासी नसल्यामुळे एसटीचे उत्पन्न खूपच घटले  आहे. त्यामुळे एसटी कर्मचाऱ्यांनाच्या वेतनाचा भार राज्य सरकार उचलेल यासाठी प्रयत्न सुरू आहेत. काळ थोडा कठीण आहे. पण त्यामुळे हताश होऊन टोकाचे पाऊल उचलू नका. हे तात्पुरते संकट आहे. त्यातून आपण मार्ग काढून एसटी कर्मचाऱ्यांचे आयुष्य पूर्ववत करण्याचा आपण प्रयत्न करत आहोत. तीन महिन्यांच्या थकीत वेतनापैकी दोन महिन्यांचे वेतन आणि बोनस दिवाळीपूर्वी देण्यात येईल.