पुणे : कल्याणीनगर पुणे येथील अपघाताच्या पार्श्वभूमीवर राज्य उत्पादन शुल्क पुणे विभागाकडून मागील तीन दिवसात 14 पथकांमार्फत राबविण्यात आलेल्या धडक मोहिमेत 32 विविध परमिट रूमविरोधात गुन्हे दाखल केले आहेत. जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेल्या आदेशानुसार या बार,पब्जचे व्यवहार तात्काळ प्रभावाने बंद ठेवण्यात आले असून सर्व परमिट सील करण्यात आली आहेत.

या कारवाईत 10 रूफटॉप, अंदाजे 16 पब, इतर 6 परवाना कक्ष बार अशा एकूण 32 परमिटचे व्यवहार तात्काळ प्रभावाने बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले असून सर्व परमिट सील करण्यात आली आहे. जिल्हाधिकारी, राज्य उत्पादन शुल्क विभागाचे आयुक्त, उपआयुक्त यांच्या मार्गदर्शनाखाली पुणे जिल्ह्यात धडक मोहिम राबविण्यात येत आहे. राज्य उत्पादन शुल्क विभागांकडून वारंवार परमिटच्या गैरव्यवहाराबाबत कारवाई करण्यात येते. कोझी बारवर आता परमिटचे व्यवहार बंद केल्याची कारवाई केलेली असली तरी दोन महिन्यापूर्वीही राज्य उत्पादन शुल्क विभागाने विभागीय गुन्हा नोंद केलेला आहे.

2023-2024 मध्ये राज्य उत्पादन शुल्क पुणे विभागाकडून एकूण 297 परमिटवर विविध कारणांसाठी गुन्हे नोंद करण्यात आलेले आहेत. त्यामध्ये 1 कोटी 12 लाख रुपये इतका दंड वसूल करण्यात आलेला आहे. 17 परमिटवर निलंबनाची कारवाईदेखील करण्यात आली असून 2 परमिट कायमस्वरुपी बंद करण्यात आल्या आहेत.

एप्रिल 2024 पासून आजतागायत 54 अनुज्ञप्त्यांवर गुन्हे नोंद करण्यात आलेले असून 5 लाख रुपये इतका दंड वसुल केलेला आहे. यात एकूण 32 अनुज्ञप्त्या सील करण्यात आलेल्या आहेत.