कोल्हापूर (प्रतिनिधी) : भाजपच्या वतीने कोल्हापुरात आज (मंगळवार) मिरजकर तिकटी येथे राज्यातील मंदिरे उघडावीत अशी मागणी करीत लाक्षणिक उपोषण करण्यात आले. या वेळी आंदोलकांनी ‘मंदिर बंद, उघडले बार…उद्धवा, धुंद तुझे सरकार, धार्मिक स्थळे सुरू करा’ अशा घोषणा देत परिसर दणाणून सोडला. पंत बाळेकुंद्री महाराज भक्त मंडळाच्यावतीने भजन, कीर्तनाच्या माध्यमातून भक्तिगीते गाऊन उद्धव सरकारला जाग येण्यासाठी साकडे घालण्यात आले. भाविकांच्या सहनशीलतेचा अंत पाहू नका, असा इशाराही देण्यात आला. 

या वेळी जिल्हाध्यक्ष राहुल चिकोडे म्हणाले की,  देशभरामध्ये महाराष्ट्रात कोरोनाचा संसर्ग वेगाने वाढला होता, त्या वेळी आम्ही मंदिरे उघडावीत अशी मागणी केली नव्हती. पण सध्या मॉल, मद्यालये, देशी दारू दुकाने सुरु, पण मंदिरे बंदच आहेत. कोणताही भाविक मंदिरामध्ये गेला की त्याचा मानसिक ताण कमी होतो. त्यामुळे, आता तरी मंदिरे उघडा पण सरकारला हे ऐकूच गेले नाही. संघटन सरचिटणीस अशोक देसाई म्हणाले की प्रखर हिंदुत्ववादी असणाऱ्या शिवसेनेने हिंदुत्व विसरून आपल्या तत्वांना तिलांजली देऊन सत्तेच्या राजकारणासाठी आपली भूमिका कुंभकर्णासारखी ठेवली आहे. अशा कुंभकर्णाला जाग आणण्यासाठी आज महाराष्ट्रात मंदिरे उघडा या मागणीसाठी आंदोलन करायला लागणे हे अत्यंत दुर्देवी आहे.

नगरसेविका उमा इंगळे, प्रमोदिनी हर्डीकर, गिरीष साळोखे, विजयसिंह खाडे-पाटील, विशाल शिराळकर, अप्पा लाड, चंद्रकांत घाटगे यांनी मंदिरे उघडण्याबाबत तीव्र भावना व्यक्त केल्या. भक्तांच्या भावनांचा अंत पाहू नये असा इशारा या वेळी त्यांनी दिला. शेवटी श्री गणेशाची आरती करून उद्धव सरकारला सुबुद्धी दे, असे साकडे घालण्यात आले.

आंदोलनात सरचिटणीस दिलीप मेत्राणी, हेमंत आराध्ये, गणेश देसाई, जिल्हा उपाध्यक्ष मारुती भागोजी, चंद्रकांत घाटगे, संजय सावंत, राजू मोरे, अमोल पालोजी, विजय आगरवाल, दीपक काटकर, प्रदीप उलपे, सुनिलसिंह चव्हाण, दिग्विजय कालेकर, भाजपा गटनेते अजित ठाणेकर, संतोष माळी, भरत काळे आदी कार्यकर्ते सहभागी झाले होते.