कोल्हापूर (प्रतिनिधी) : श्रीक्षेत्र नृसिंहवाडी येथील दत्त मंदिरात शनिवार दिनांक 14 डिसेंबर रोजी सायंकाळी 5 वाजता श्री दत्त जन्मकाळ सोहळा संपन्न होणार असल्याचे श्री नृसिंह सरस्वती स्वामी दत्त देवसंस्थान नृसिंहवाडी चे अध्यक्ष वैभव विजय पुजारी आणि सचिव सोनू उर्फ संजय पुजारी यांनी स्पष्ट केले. येथील दत्त देवस्थानच्या कार्यालयात बोलविण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

चालू वर्षी मार्गशीर्ष पौर्णिमा 2 दिवस असून श्री दत्त जन्म काळ नेमक्या कोणत्या दिवशी होणार याची संभ्रमावस्था असल्याने देवस्थानमार्फत भाविकांना मार्गदर्शन होण्यासाठी पत्रकार परिषद बोलवण्यात आली असल्याचे सांगून ते पुढे म्हणाले, श्री दत्त जन्म काळासाठी प्रदोष व्यापिनी पौर्णिमा घ्यावी असे असलेने शनिवार दिनांक 14 डिसेंबर रोजी प्रदोष व्यापिनी पौर्णिमा आहे त्यामुळे श्रीक्षेत्र नृसिंहवाडी येथील दत्त मंदिरात शनिवार दिनांक 14 डिसेंबर रोजी सायंकाळी ठीक 5 वाजता दत्त जन्मकाळ सोहळा संपन्न होणार आहे.

श्री दत्त जयंती उत्सव कालात महाराष्ट्रासह कर्नाटक गोवा अशा अनेक राज्यातून सुमारे 3 ते 4 लाख भाविक श्री दत्त दर्शनासाठी येणे अपेक्षित असल्याने भाविकांना दत्त देवस्थानमार्फत दर्शन घेणे सुलभ होण्यासाठी दर्शन रांग व्यवस्था मुखदर्शन क्लोज सर्किट टीव्ही ध्वनिक्षेपक यंत्रणा मोफत महाप्रसाद कापडी मंडप शामियाना आणि विद्युत रोषणाई सुरक्षारक्षक आदी आवश्यक व्यवस्था दत्त देव संस्थानमार्फत करण्यात येत असून ज्यादा गाड्या सोडण्यासाठी राज्य परिवहन महामंडळ आणि गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी पोलीस बंदोबस्तासाठी संपर्क केला असल्याचे त्यांनी सांगितले.

यावेळी विश्वस्त संजय नारायण पुजारी, सदाशिव जेरे, पांडुरंग रुकके पुजारी, गजानन गेंडे, संतोष खोंबारे पुजारी, विपुल हावळे, आनंद पुजारी यांनी दिली.