कोल्हापूर (प्रतिनिधी) : शहरातील व्यापाऱ्यांकडून थकित स्थानिक संस्था कराच्या वसूलीसाठी व्यापारी असोसिएशन निहाय कॅप्म लावा, व्यापाऱ्यांच्या काही समस्या व शंका असल्यास त्यांचे योग्य पद्धतीने निराकरण करा. अशी सुचना स्थायी समिती सभापती सचिन पाटील यांनी केली. ते स्थानिक संस्था कर विभागाच्यावतीने थकित कराबाबत आढावा घेण्यासाठी झालेल्या बैठकीत बोलत होते.
या बैठकीला गटनेते शारगंधर देशमुख, अतिरिक्त आयुक्त नितीन देसाई, मुख्याधिकारी विलास सांळोखे यांच्यासह शहरातील सर्व व्यापारी असोसिएशन तसेच व्यापारी संघटनाचे पदाधिकारी उपस्थित होते.
शारगंधर देशमुख म्हणाले, शहरातील व्यापाऱ्यांनी महापालिकेचा स्थानिक संस्था कर लवकरात लवकर भरावा. शासन आदेशानुसार कराची आकारणी आणि वसूली होणे गरजेचे असल्याचे सांगितले.
अतिरिक्त आयुक्त नितीन देसाई म्हणाले, शहरातील व्यापाऱ्यांकडून थकित स्थानिक संस्था कराच्या वसूलीसाठी व्यापारी असोसिएशनच्या मदतीने असोसिएशन निहाय कॅम्प लावण्याचे नियोजन केले जाईल.
कोल्हापूर चेंबर ऑफ कॉमर्सचे संजय शेटे म्हणाले, महापालिकेचा स्थानिक संस्था कर व्यापारी निश्चितपणे भरतील. याबाबत महापालिका प्रशासनाने विशेष कॅम्प लावावेत.
यावेळी कोल्हापूर चेंबर ऑफ कॉमर्सचे उपाध्यक्षक शिवाजीराव पोवार, मानद सचिन धनंजय दुगे, संचालक राहुल नष्टे, कोल्हापूर कापड व्यापारी संघाचे अध्यक्ष संपत पाटील, कोल्हापूर चेंबर व्यापारी प्रतिनिधी जयंत गोयानी, भावेश भानुशाली, कोल्हापूर सराफ व्यापारी संघाचे अध्यक्ष कुलदीप गायकवाड, कोल्हापूर इंडिस्ट्रिज असोसिएशन प्रदीप व्हरांबळे, चंद्रकांत रोट यांच्यासह, सर्व व्यापारी असोसिएशन, व्यापारी संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते.