कोल्हापूर ( प्रतिनिधी ) : कोल्हापूर शहराच्या हद्दवाढीचा प्रश्न लवकरात लवकर मार्गी लावा, अशी सूचना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शुक्रवारी जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींना केली. ‘जिल्हा नियोजन’च्या प्रारूप आराखड्याचे पवार यांच्या अध्यक्षतेखाली पुणे येथे झालेल्या राज्यस्तरीय समितीच्या बैठकीत 518.56 कोटींचा आराखडा सादर करत 421 कोटींची अतिरिक्त मागणी करण्यात आली. यावेळी जिल्ह्याला भरीव निधी देऊ, अशी ग्वाही पवार यांनी दिली.
पालकमंत्री आबिटकर यांच्यासह महापालिका आयुक्त के. मंजुलक्ष्मी यांनी महापालिकेच्या नव्या इमारतीसाठी निधीची मागणी केली. मंत्री पवार म्हणाले, तुम्ही हद्दवाढच करत नाही, तर पैसे कशाला पाहिजे? कशाला नवी इमारत हवी? हद्दवाढ झाल्याखेरीज कोल्हापूर शहराचा विकास तरी कसा होणार, यामुळे हद्दवाढीसाठी आग्रह धरा. कोल्हापूर शहराची हद्दवाढीचा प्रश्न लवकरात लवकर सोडवा. शहराच्या हद्दवाढीचा निर्णय घ्या, लागेल तितका निधी देतो, असेही त्यांनी सांगितले.