कोल्हापूर (प्रतिनिधी) – आजच्या कृत्रिम बुद्धिमत्तेच्या युगात संशोधन आणि अध्यापनाची गती अत्यंत वाढली असून दैनंदिन अभ्यासक्रमासोबत अध्यापनात समाज उपयोगी संशोधनास चालना देणे अत्यंत महत्त्वाचे असल्याचे प्रतिपादन आयआयटी गोव्याचे डायरेक्टर डॉ. बी. के. मिश्रा यांनी केले.

श्री वारणा विभाग शिक्षण मंडळ संचालित तात्यासाहेब कोरे इन्स्टिट्यूट ऑफ इंजीनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी, यशवंतराव चव्हाण वारणा महाविद्यालय, तात्यासाहेब कोरे कॉलेज ऑफ फार्मसी यांच्या संयुक्त विद्यमाने आणि इंडियन सोसायटी फॉर टेक्निकल एज्युकेशन, इंडियन फार्मास्युटिकल असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने पी एम् उषा योजनेअंतर्गत आयोजित संशोधन उपक्रमाद्वारे उच्च शिक्षण संस्थेतील क्षमतांचा विकास याविषयावरील कार्यशाळेत ते बोलत होते.

उद्घाटन प्रसंगी अध्यक्षीय भाषणात श्री वारणा विभाग शिक्षण मंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ विलास कार्जिन्नी यांनी संशोधनाच्या प्रोत्साहनासाठी राज्य आणि राष्ट्रीय पातळीवरील योजनांचा महाविद्यालयांनी जास्तीत जास्त लाभ करून घेणे गरजेचे असल्याचे नमूद करताना ‘वय’ अध्ययन तथा संशोधनामध्ये मर्यादा असू शकत नसल्याचे अधोरेखित केले. अभ्यासक्रमासोबत समाज उपयोगी नवनवीन उत्पादन साकारुण त्यांचे पेटंट करण्यावर भर देणे गरजेचे असल्याचे डॉ पि के खरात यांनी नमूद केले. महाविद्यालयांमध्ये इनक्युबेशन सेंटरच्या माध्यमातून कृषी क्षेत्रातील संशोधनावर अधिक महत्व देण्याचे गरजेचे असल्याचे सांगताना डॉ व्हि के तिवारी यांनी करताना शेती विषयक महा मॅंगो, महा बनाना शुगरकेन यासारख्या प्रकल्पावर केलेल्या संशोधनाचा उलगडा केला. सामान्यांच्या जीवनातील प्रश्नांवर संशोधन करून मनुष्याचे राहणीमान सुधारण्यावर भर देणे गरजेचे असल्याचे मत डिपार्टमेंट ऑफ टेक्नॉलॉजी, शिवाजी विद्यापीठचे डायरेक्टर डॉ एस् एन् सपळी यांनी मांडले.

दोन दिवस चालणाऱ्या या कार्यशाळेत महाराष्ट्र, कर्नाटक, गोवा अशा विविध राज्यांतील नामवंत महाविद्यालयातून १५० अधिक प्राध्यापकांनी सहभाग नोंदवला आहे.

कार्यशाळेचे स्वागत आणि प्रास्ताविक डॉ एस् एम् पिसे तर आभार डॉ उमेश देशनवार यांनी केले. यावेळी डॉ एस् व्ही आणेकर, डॉ ए एम् शेख, डॉ जॉन डिसोझा, डॉ संजीवकुमार खंडाल, सौ. शोभा कुंभार, कार्यशाळेचे समन्वयक प्रा सौरभ बोरचाटे, डॉ एस् एस् खोत, डॉ किरण पाटील आदी मान्यवर उपस्थित होते. डॉ आर व्ही काजवे आणि प्रा जी बी कांबळे यांनी सुत्रसंचलन केले.