मुंबई : “भाजपाला बहुमतापेक्षा कमी जागा मिळाल्या तर देशातील समविचारी पक्षांना एकत्र आणून आम्ही देशाला एक स्थिर सरकार देण्याचा नक्कीच प्रयत्न करू”, असं वक्तव्य राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी शरदचंद्र पवार या पक्षाचे प्रमुख खासदार शरद पवार यांनी केलंय .

 “यंदाच्या लोकसभा निवडणुकीत भारतीय जनता पार्टीला मागच्या दोन्ही लोकसभा निवडणुकांपेक्षा कमी जागा मिळतील. महाराष्ट्रातील त्यांच्या जागा कमी होतील. 2019 च्या लोकसभा निवडणुकीत आम्हाला म्हणजेच राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसला मिळून महाराष्ट्रात केवळ पाच जागा मिळाल्या होत्या. मात्र यावेळी त्या जागा वाढणार आहेत.” असा दावा शरद पवार यांनी केलाय. एका यूट्यूब चॅनलला दिलेल्या मुलाखतीत शरद पवारांनी हा दावा केलाय.

राहुल गांधी यांच्या नेतृत्वावर आत्तापर्यंत अनेकदा भाजपा नेत्यांनी विविध प्रकारे टीका केली आहे. तसंच त्यांच्यावर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे अध्यक्ष शरद पवार यांनीही टीका केली आहे. पण शरद पवार यांनीच एका मुलाखतीत आता राहुल गांधी हे राजकारणाबाबत गंभीर आहेत असं म्हटलं आहे. तसंच पंतप्रधान नरेंद्र मोदीच फक्त त्यांची टिंगल करतात असंही म्हटलं आहे. महाविकास आघाडी आणि लोकसभा निवडणुकीबाबतही त्यांनी भाष्य केलं आहे.

राजस्थान ,गुजरातमध्ये कॉंग्रेसला जागा मिळतील –

यावेळी बोलताना शरद पवार म्हणाले, “2019 च्या लोकसभा निवडणुकीत मध्य प्रदेशात काँग्रेसला केवळ एक जागा मिळाली होती. त्यामध्ये यंदा सुधारणा दिसेल. राजस्थान आणि गुजरातमध्ये काँग्रेसला एकही जागा मिळाली नव्हती, त्या दोन्ही राज्यात काँग्रेसला यंदा काही जागा मिळतील. हरियाणा, पंजाब आणि दिल्ली या तिन्ही राज्यातील काँग्रेसच्या स्थितीत तुम्हाला सुधारणा दिसेल. तर तामिळनाडू, केरळ, तेलंगणा, आंध्र प्रदेश आणि कर्नाटकमध्ये भाजपाचा फारसा प्रभाव नाही, त्यांना तिथे फारसा वाव नाही”, असंही शरद पवार म्हणाले. “एकटे पंतप्रधानच असे आहेत जे राहुल गांधींची टिंगल, टवाळी करतात. त्यांना शहजादे वगैरे म्हणतात. पंतप्रधानांचा हा अपवाद सोडला तर राहुल गांधींकडे बहुसंख्य वर्ग गांभीर्याने पाहतो आहे. ही जमेची बाजू आहे, असंही  पवार यावेळी म्हणाले.