कोल्हापूर ( प्रतिनिधी ) – राज्यातील महावितरण, महापारेषण आणि महानिर्मिती या कंपन्यांमध्ये 20 वर्षांपासून काम करणाऱ्या 42,000 कंत्राटी कामगारांसाठी सरसकट ‘हरियाणा पॅटर्न’ लागू करावा अशी मागणी विधान परिषदेतील काँग्रेसचे गटनेते आमदार सतेज पाटील यांनी केली. यावर उत्तर देताना ऊर्जामंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सर्व युनियन सोबत आजच ऊर्जा सचिवांची बैठक होत असून तोडगा काढण्याची जबाबदारी त्यांच्याकडे दिली आहे, अशी माहिती सभागृहात दिली.

आमदार सतेज पाटील यांनी राज्यातील वीज कंपन्यांमधील कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या संदर्भात प्रश्न मांडले. कंत्राटी वीज कर्मचाऱ्यांनी वेतन वाढ, रोजंदारी कामगार पद्धतीने शाश्वत रोजगार आणि अन्य विविध मागण्यांसाठी कंत्राटी वीज कामगारांनी यापूर्वी दोन वेळा संप केला होता. आता पुन्हा ९ जुलै रोजी सुमारे 42,000 कंत्राटी कर्मचारी आंदोलनाच्या तयारीत असल्याकडे त्यांनी लक्ष वेधले.

कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या मागण्यांसंदर्भात यापूर्वी माननीय ऊर्जा मंत्री व ऊर्जा सचिव यांच्या सोबत बैठकीमध्ये सकारात्मक भूमिका घेण्यात आली होती. मात्र , त्यावेळी झालेल्या चर्चेस पुढे मूर्त रूप मिळाले नाही, ही बाब आमदार सतेज पाटील यांनी सरकारच्या निदर्शनास आणून दिली.

महावितरण आणि महापारेषणच्या वेतनामधील फरक दूर करता येईल का? सरळ सेवा भरतीसाठी अतिरिक्त गुण वाढविण्यात येतील का? कंत्राटी कर्मचाऱ्यांना सरसकट “हरियाणा पॅटर्न” लागू करणे सोयीस्कर होऊ शकेल का? असे प्रश्न त्यांनी उपस्थित केले. ऊर्जा सचिवांसोबत झालेल्या बैठकीमध्ये मार्ग निघाला नसल्यामुळे हा प्रश्न प्राधान्याने सोडवावा अशी मागणीही आमदार पाटील यांनी केली.

यावर, उत्तर देताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, सध्या “हरियाणा पॅटर्न” मधील सर्व मुद्दे आपण घेतले आहेत. या कर्मचाऱ्यांना नेहमीच सभेतील प्रवेशाचा मार्ग सुकर करण्याकरता त्यांच्या मागील अनुभवाच्या आधारे त्यांना सरळ सरळ भरती मध्ये प्रतिवर्षी दोन असे पाच वर्षाच्या अनुभवासाठी जास्तीत जास्त दहा गुण सध्या दिले जातात. याबाबत वाढीव गुणांच्या मागणी संदर्भात पडताळणी करून पाहता येईल. तसेच सर्व युनियन सोबत आजच ऊर्जा सचिवांची बैठक होत असून या बैठकीत तोडगा काढण्याची जबाबदारी त्यांच्याकडे दिली असल्याचे फडणवीस यांनी स्पष्ट केले.