कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोल्हापूर शहरात सगळीकडे दिवाळी सणाची खरेदी करण्यासाठी नागरिकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केलेली पहायला मिळत आहे. त्याचबरोबर विधानसभेची आचारसंहिताही सुरू आहे. अशातच आता, ऐन दिवाळी सणाच्या तोंडावर एक धक्कादायक घटना समोर येत आहे. कोल्हापुरातील मध्यवर्ती रेल्वे स्टेशन समोरील कोरगावकर कंपाउंडलगत दगडाने ठेचून शाहूपुरी येथील तरुणाचा अमानुषपणे खून केल्याची घटना आज पहाटे घडली असल्याची माहिती समोर येत आहे.
सतीश महादेव पाटील (वय 48 रा. शाहूपुरी कोल्हापूर) असे खून झालेल्या व्यक्तीचं नाव आहे. या खून प्रकरणी शाहूपुरी पोलिसांनी रोहन विजय गायकवाड याला ताब्यात घेतलं असून सौरभ जाधव आणि धीरज करंगाळे हे संशयितांनी पलायन केले आहे. फरारी मारेकऱ्यांचा शोध पोलिस घेत आहेत. लवकरच त्यांना अटक करण्यात येईल असे पोलीस निरीक्षक अजयकुमार शिंदकर यांनी सांगितले. हल्ल्याचे कारण अद्याप स्पष्ट झाले नसले तरी दारूच्या नशेतच हा खून झाला असल्याचा पोलिसांचा संशय आहे.
रोहन गायकवाड यांच्यासह तिघांनी सतीश पाटील यांच्यावर रविवार रात्री 12 च्या सुमारास काही कारणात्सव दगडाने हल्ला केला होता. डोक्यावर जास्त प्रमाणात इजा झाल्याने जखमीला शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र उपचार सुरू असतानाच पाटील यांचा मृत्यू झाला. दगडाने ठेचून हल्ला झाल्याची माहिती पोलीसांना समजताच शाहूपुरी पोलिस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. संशयित गायकवाड याला ताब्यात घेण्यात आले आहे. या घडलेल्या घटनेमुळे सर्वत्र खळबळ उडाली आहे.