मुंबई : आगामी विधानसभा निवडणुका जवळ आल्या आहेत. राज्य सरकारच्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेच श्रेय घेण्याबाबत महायुतीतील घटकपक्षांत चढाओढ होत असल्याचं दिसून येत आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या जाहिरातीतून अजित पवार यांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादीने ‘मुख्यमंत्री’ हा शब्दच वगळला असल्याने एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत नाराजी पसरली आहे. माझी लाडकी बहीण योजना – महिन्याला दीड हजार रुपये, दादाचा वादा लाभ आणि बळ असा उल्लेख करून जाहिरातीत अजित पवार यांचा फोटो वापरला गेला आहे.

मुख्यमंत्री शब्द वगळल्याप्रकरणी उमेश पाटील काय म्हणाले..?


राष्ट्रवादीचे उमेश पाटील यांनी मुख्यमंत्री शब्द वगळल्याप्रकरणी प्रतिक्रिया देत म्हटले, की केंद्रातही काही योजना ह्या पंतप्रधानांच्याच नावे असतात, तशा राज्यात काही योजना मुख्यमंत्र्यांच्या नावे असतात. परंतु ‘लाडकी बहीण’ हा योजनेच्या नावाचा शॉर्टफॉर्म जनतेपर्यंत लवकर पोहोचावा आणि समजावा यासाठी तसा उल्लेख केला होता.
अजित पवार यांनी अर्थमंत्री म्हणूनच अर्थसंकल्प मांडताना लाडकी बहीण योजना सांगितली होती. त्यांना श्रेय घ्यायचंच असतं, तर त्यांनी तेव्हाच या योजनेला ‘उपमुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना’ असं घोषित केलं असतं. राज्य सरकारच्या वतीने बजेटमध्ये ज्या योजना मांडल्या, त्यातील काही योजनांना मुख्यमंत्र्यांचं नाव दिलं जातं. दादांच्या अर्थ विभागानेच ते नाव दिलं, त्यावेळेस त्यांचा दुसरा विचार असता तर अन्य कोणाची नावं दिली असती. कार्यकर्त्यांच्या फॉर्म आणि सरकारी योजनेतही तेच अधिकृत नाव आहे असंही उमेश पाटील म्हणाले.
आमच्या पक्षाचा जनसंवाद दौरा हा संभाव्य उमेदवार किंवा आमदार असलेल्या मतदारसंघात सुरु आहे. तिथल्या स्थानिक कार्यकर्त्यांनी बोर्डावर काय लिहिलं, याला महत्त्व नाही, असंही उमेश पाटील यांनी म्हटलं आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेचे आमदार, संजय शिरसाट यांनी याबाबतची प्रतिक्रिया देताना म्हटलं, की नाव वगळण्यावरुन नाराजी नाही पण महायुतीत काही वाद असल्याने काही गैरसमज पसरु नयेत, यासाठी काळजी घ्यायला हवी. कार्यकर्त्यांच्या मनात आपल्या नेत्याविषयी आदर असला पाहिजे, पण योजना किंवा घोषणेला सर्वांनी मिळून साथ द्यायला हवी, असंही शिरसाट म्हणाले.